वळसे पाटलांच्या आंबेगावमध्ये चुरस वाढणार: पहिल्या दिवशी सर्वाधिक उमेदवारी अर्जांची विक्री; जिल्ह्यातील स्थिती काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:24 PM2024-10-23T12:24:08+5:302024-10-23T12:27:07+5:30
Vidhan Sabha Election: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबरला जारी झाल्यानंतर मंगळवारपासून अर्जाची विक्री सुरू झाली आहे.
Pune Election Update ( Marathi News ) : जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघात मंगळवारपासून (दि. २२) खऱ्या अर्थाने रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अर्जाची विक्री आणि स्वीकृती सुरू झाली असता पहिल्याच दिवशी तब्बल ३५७ उमेदवारांनी ७७२ अर्ज खरेदी केले आहेत. त्यापैकी ११ उमेदवारांनी लगेचच अर्ज दाखल केले आहेत. त्यात आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून अशोक दत्तात्रय काळे यांनी अर्ज दाखल केला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ५९ अर्जाची विक्री आंबेगाव मतदारसंघात झाली असून, याच मतदारसंघात सर्वाधिक ४ अर्ज दाखल झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबरला जारी झाल्यानंतर मंगळवारपासून अर्जाची विक्री सुरू झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २१ मतदारसंघांमध्ये ३५७ जणांनी ७७२ अर्ज खरेदी केल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली. त्यात सर्वाधिक ३० जणांनी ५९ अर्ज आंबेगाव मतदारसंघातून खरेदी केले आहेत. त्या खालोखाल पिंपरी मतदारसंघातील २९ जणांनी ५९ अर्ज खरेदी केले आहेत. वडगाव शेरी मतदारसंघातून २६ जणांनी ४९ अर्ज घेतले आहेत.
अर्ज विक्रीसोबतच अर्जाची स्वीकृती सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी आंबेगाव मतदारसंघात ४ जणांनी, तर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात तिघांनी अर्ज दाखल केले आहेत. शिरूर, इंदापूर, बारामती व वडगाव शेरी येथे प्रत्येकी एकाने अर्ज दाखल केला आहे.