एका भूखंडाची अनेकदा केली विक्री
By admin | Published: June 17, 2017 06:22 AM2017-06-17T06:22:47+5:302017-06-17T06:22:47+5:30
पवन मावळातील जोवण या गावातील १ हेक्टर ४४ आर या जागेची तीन वर्षांत अनेकांना विक्री केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. मूळ मालकाऐवजी
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : पवन मावळातील जोवण या गावातील १ हेक्टर ४४ आर या जागेची तीन वर्षांत अनेकांना विक्री केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. मूळ मालकाऐवजी बोगस व्यक्ती उभी करून दलालांनी हा प्रताप केला असून, त्यामध्ये महसूल विभागाची यंत्रणाही सामील असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बनावट कागदपत्राद्वारे जमिनी खरेदी- विक्री करणाऱ्या दलालांचे मोठे रॅकेट मावळात कार्यरत आहे. त्यावर महसूल व पोलीस दोन्ही यंत्रणांचे नियंत्रण नाही. उलट या यंत्रणा संबंधितांकडे सोयीस्कर व अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप फसवणूक झालेले करीत आहेत. असाच प्रकार जोवण या गावात घडला आहे. येथील बाबू वाघू गोणते व आबू बाबू गोणते यांच्याकडून बांद्रा (मुंबई) येथे राहणारे महेंद्र पी. बहल व किरण बहल या दाम्पत्याने १२ एप्रिल १९९० रोजी गट नंबर १७६ मधील जागा खरेदी केली. त्यांच्यातील व्यवहाराचा दस्तनोंदणी क्रमांक १७२३/१९९० असा आहे. गावकामगार तलाठी कार्यालयाच्या दप्तरी याबाबत नोंद झाल्यानंतर बहल यांची ताबे वहिवाट सदर जागेवर सुरू आहे. २० एप्रिल २०१७पर्यंत सात-बारा उताऱ्यावर बहल यांचे नाव जागामालक म्हणून होते. बहल हे मुंबईत व्यवसाय करीत असल्याने कामाच्या व्यापामुळे त्यांना या जागेच्या देखभालीकडे सातत्याने लक्ष देता आले नाही. दरम्यानच्या काळात एका दलालाने त्यांच्या त्याच जागेचा विक्री व्यवहार परस्पर केला. मूळ मालक बहल दाम्पत्याच्या जागी अन्य कोणाला उभे करून बहल यांच्या नावाचे बनावट पॅनकार्ड व अन्य कागदपत्रे तयार केली. ती सादर करून २० एप्रिल २०१४ रोजी उपनिबंधक नोंदणी कार्यालय मावळ २ या ठिकाणी अ. क्र. ४९११/१४ प्रमाणे खरेदीखत दस्त केले, असा आरोप बहल दाम्पत्याने केला आहे.
पोलिसांकडून तपासात दिरंगाई
मूळ मालकाने नोंदवलेल्या हरकतीची दखल न घेता, ती फेटाळण्यात आल्याने संतप्त झालेले बहल यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात वैष्णव बळीराम गायकवाड, मनीष चंद्रकांत पांडे, विशाल पांडुरंग पाटील व आणखी दोन अशा पाच जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस प्रशासनाकडून तपासात दिरंगाई झाल्याने गायकवाड याने सदर जागा ५ नोव्हेंबर २०१६ला लोणावळ्यातील अविनाश श्याम सुळे व संतोष भाऊसाहेब कडू यांना विकण्याचा प्रयत्न केला. परंतु खरेदीस इच्छुक असलेले कडू यांना या बनावटगिरीविषयी माहिती मिळताच त्यांनी जागेचा व्यवहार करण्याचे टाळले.
जागेचे मूळ मालक असलेले महेंद्र पी. बहल व किरण एम. बहल असतानाही जमीन खरेदी-विक्रीचे बोगस व्यवहार करणाऱ्या वैष्णव गायकवाड या दलालाने बहल यांच्या जागेचा अनेकांबरोबर व्यवहार केला. या प्रकरणी बहल यांनी मावळ-मुळशी प्रांत अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला आहे. बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची दिशाभूल केली. ज्यांच्याशी जमीन विक्री व्यवहार केला त्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे या जागेचे सर्व फेरफार रद्द करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी बहल यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
मंडल अधिकारी सामील ?
नोंदणीदस्त झाले; मात्र सात-बारा उताऱ्यावर नोंद व्हावी, यासाठी वैष्णव बळीराम गायकवाड (रा. जांबे, पो. नेरे, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी अर्ज केला.
१ जुलै २०१५ रोजी अर्ज देऊन फेरफार नोंद करण्यात आली. त्यानंतर बहल यांच्या जागी गायकवाड यांचे नाव सात-बारावर आले. दरम्यान, आपल्या जागेची परस्पर विक्री होत असल्याचा प्रकार बहल यांच्या लक्षात आला. त्यांनी २० आॅगस्ट २०१५ रोजी झालेला फेरफार रद्द होण्यासाठी मंडल अधिकाऱ्यांना अर्ज देऊन हरकत नोंदवली. मात्र, या प्रकारात सामील असल्याने मंडल अधिकारी यांनी हरकत फेटाळून फेरफार कायम केल्याचा आरोप बहल यांनी केला आहे.
वैष्णव गायकवाड यांची बनावटगिरी
मात्र, गायकवाड यांनी बोगस खरेदीचा प्रकार पुढेही सुरूच ठेवला. गायकवाड याच्याकडून पुन्हा त्या जागेचा व्यवहार करण्यात आला.
४ मे २०१७ रोजी पुण्यातील स्वप्निल विजय खडके, शिरीष भालचंद्र खडके व अशोक अनंतराव वराडे यांच्याबरोबर व्यवहार झाला.
खडके आणि वराडे यांनी जागा खरेदी केली. खडके बंधू व वराडे यांनी सदर जागेपैकी ४० आर क्षेत्राचे १२ मे २०१७ रोजी बिबवेवाडी ( पुणे) येथील प्रवीण मनोहर शेलार व संतोष एकनाथ इसवे यांना साठेखत करून दिले.