जुना बाजारामध्ये खुलेआम सत्तुरची विक्री ; पाेलिसांनी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 04:28 PM2019-08-13T16:28:21+5:302019-08-13T16:29:57+5:30
जुन्या बाजारात खुलेआम सत्तुरची विक्री करणाऱ्यांना पाेलिसांनी छापा टाकत अटक केली.
पुणे : पुण्यातील मंगळवार पेठेत भरणाऱ्या जुना बाजारमध्ये खुलेआम सत्तुरची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना फरासखाना पाेलिसांनी अटक केली आहे. दिनेश सुखलाल साळंके ( वय 42, रा. कसबा पेठ) राधाबाई शामराव पवार (वय 70, रा. मंगळवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बकरी ईदनिमित्त फरासखाना पाेलीस स्टेशनचे वरीष्ठ पाेलीस निरीक्षक किशाेर नावंदे हे तपास पथकातील स्टाफसह गाडीतळ पाेलीस चाैकीच्या हद्दीत पेट्राेलिंग करत हाेते. त्यावेळी त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मंगळवार पेठ येथील जुना बाजारामध्ये काही लाेक पथारी लावून विनापरवाना सत्तुरांची विक्री करीत आहेत. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता आराेपी सत्तुरची विक्री करताना आढळून आले. पाेलिसांनी त्यांच्याकडे परवान्याची मागणी केली. परंतु त्यांच्याकडे कुठलाही परवाना नव्हता. त्यामुळे पाेलिसांनी आराेपीकडील 4 हजार रुपयांचे 15 सत्तुर ताब्यात घेतले. तसेच आराेपींना अटक केली.
पुणे शहरात घडणाऱ्या बहुतांशी गुन्ह्यांमध्ये धारदार लाेखंडी काेयते व सत्तुर सारख्या हत्यारांचा वापर हाेत असल्याचे व सदरची हत्यारे मंगळवार पेठे भागातील जुन्या बाजारातून विक्री हाेत असल्याचे निदर्शनास आल्याने सदरची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात आले.