विलगीकरण कक्षात पाण्याची विक्री; पुण्यातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 10:51 PM2020-05-26T22:51:37+5:302020-05-26T22:52:03+5:30
अस्वच्छता, जेवणाची आबाळ
पुणे : एकीकडे शहरातील रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे विलगीकरण कक्षातील लोकांची संख्याही वाढत आहे. परंतु, येथे पाणीही विकत घेऊन पिण्याची वेळ नागरिकांवर आली असून, अगदीच सुमार दर्जाच्या सुविधा पुरविल्या जात आहे.
सिंहगड कॉलेज हॉस्टेलमधील विलगीकरण कक्षातील नागरिकांना तब्बल २०० रुपये दराने पाण्याचे बॉक्स विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील पाणी अशुद्ध आणि बेचव असल्याने नागरिकांवर पाणी विकत घेऊन प्यायची वेळ आली आहे. या ठिकाणी जेवण व्यवस्थित मिळत नसल्याचे ‘लोकमत’ने यापूर्वीच निदर्शनास आणून दिले होते.
सिंहगड हॉस्टेलमध्ये मागील तीन दिवसांपासून प्यायचे पाणी अशुद्ध असल्याने विकत घ्यावे लागत आहे. बाहेरून लोक येत आहेत व २०० रुपयांना पाणी विकत आहेत. औषधे मिळालेली नाहीत. आरोग्य तपासणी झालेली नाही.
- राकेश आलेटी, नागरिक, भवानी पेठ
संस्थेचा आरओ प्लान्ट सुरू असून शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. स्वच्छता आहे. औषधांची व्यवस्थित माहिती दिली जात आहे. काही ठराविक लोकांच्या तक्रारी असल्या तरी अन्य शेकडो नागरिक संतुष्ट आहेत.
- जयंत भोसेकर, उपायुक्त, पुणे महानगरपालिका