पुण्यामध्ये सहा महिन्यांत ५८ हजार दुचाकी-चारचाकींची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 03:52 PM2021-12-28T15:52:47+5:302021-12-28T15:54:23+5:30
प्रसाद कानडे पुणे : एप्रिल ते सप्टेंबर २१ दरम्यान पुण्यात ६३ हजारांहून अधिक वाहनांची विक्री झाली आहे. यात दुचाकी ...
प्रसाद कानडे
पुणे : एप्रिल ते सप्टेंबर २१ दरम्यान पुण्यात ६३ हजारांहून अधिक वाहनांची विक्री झाली आहे. यात दुचाकी ३५ हजार ६२२ तर चारचाकी २२०५५ चा समावेश आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही मोठी वाढ आहे. याचा विचार केला तर दररोज ३२२ पुणेकरांच्या दारात नवे वाहन दाखल झाले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी चारचाकीची कमालीची कमतरता आहे. तरीदेखील चारचाकीचा आकडा २२ हजारहून अधिक आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अनेकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करण्याचे टाळून खासगी वाहनाने प्रवास करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे खासगी वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २१ दरम्यान पुणे आरटीओकडे नोंद झालेल्या आकडेवारीनुसार दुचाकी ३५, ६२२ तर चारचाकी २२०५५ इतकी विक्री झाली. मागच्या वर्षीच्या तुलनेने दुचाकीमध्ये १९,५०० तर चारचाकीमध्ये १३, ३६९ वाहनांची वाढ आहे.
सहा महिन्यांत एकूण ६३ हजार २६१ वाहने
एप्रिल ते सप्टेंबर २१ दरम्यान पुण्यात एकूण ६३ हजार २६१ वाहनांची विक्री झाली. यात सर्वाधिक संख्या दुचाकींची होती. मागच्या वर्षीच्या आकडेवारीनुसार पुण्यात सर्व वाहनांचा विचार केला तर जवळपास ४० लाख वाहने आहेत. यात आता ६३ हजार वाहनांची भर पडली आहे. तसेच ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानचा वाहन विक्रीचा डेटा यात नाही. ती संख्या असती तर वाहनांच्या विक्रीने लाखाचा टप्पा ओलांडला असता.
स्कूल बसला ग्रहण :
कोरोनाच्या लाटेत रिक्षासह स्कूलबस व्यवसायाला मोठे ग्रहण लागले. रिक्षा व्यवसाय आता नियमित झाला आहे. मात्र स्कूल बसचा व्यवसाय पुरता संपला आहे. त्यामुळे या सहा महिन्यांत एकाने देखील स्कूल बस खरेदी केलेली नाही. स्कूल बसची विक्री शून्य आहे. यावरून या व्यवसायाला किती मोठा फटका बसला हे लक्षात येते.
रिक्षाची धावाधाव
मागच्या वर्षी या काळात पुण्यात केवळ १७ रिक्षांची विक्री झाली होती. यंदाच्या वर्षी मात्र ९२४ रिक्षांची विक्री झाली आहे. रिक्षा व्यवसायासाठी हे थोडे तरी आशादायी चित्र आहे. तसेच रुग्णवाहिकादेखील ४ वरून ७८ इतकी झाली आहे.