अल्पवयीन विद्यार्थ्याकडून " पीएमपी " च्या बनावट पासची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 07:22 PM2019-07-30T19:22:09+5:302019-07-30T19:22:57+5:30
पीएमपी कडून विद्यार्थ्यांना ७५० रुपयांचा सवलतीच्या दरातील मासिक पास वितरीत केला जातो..
पुणे : अल्पवयीन विद्यार्थ्याकडून बनावट मासिक पास तयार करून विद्यार्थ्यांना विक्री केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वाहकाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर विद्यार्थ्याविरूध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याला अटक केली आहे.
पीएमपी कडून विद्यार्थ्यांना ७५० रुपयांचा सवलतीच्या दरातील मासिक पास वितरीत केला जातो. हा पास पीएमपीच्या सर्व पास केंद्रांसह प्रमुख बसस्थानकांवर उपलब्ध करून दिला जातो. त्यासाठी विद्यार्थ्याचे महाविद्यालयाचे ओळखपत्रासह अन्य कागदपत्रे आवश्यक असतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना पास वितरीत केले जातात. काही दिवसांपूर्वी पुणे स्टेशन आगारातील पीएमपीचे वाहक अमित सैताने हे स्वारगेट ते पुणे स्टेशन या मार्गावर कार्यरत असताना त्यांना एका विद्यार्थ्याकडे बनावट पास असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता हा पास एका अल्पवयीन विद्यार्थ्याने ६५० रुपये घेऊन दिल्याचे त्याने सांगितले. यानंतर मुख्य वाहतुक निरीक्षक कुसाळकर व इतर कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी सापळा रचून संबंधित विद्याथ्यार्ला बनावट पास विकताना रंगेहाथ पकडले.
संबंधित विद्यार्थी वडगाव शेरी येथे राहणारा असून त्याच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने आणखी किती बनावट पास तयार करून दिले, याचा तपास केला जात आहे. यापुवीर्ही बनावट पास सापडण्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच पासवर खाडाखोड करून तारखा बदलण्याचे प्रकारही सातत्याने उघडकीस आले आहेत. यापुढील काळात असे प्रकार समोर आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
-------------