डॉ. सलिम अली जयंती विशेष : पक्षी म्हणताहेत, आमच्या हक्काच्या घरावर आरक्षण टाका!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 12:15 PM2022-11-12T12:15:44+5:302022-11-12T12:18:26+5:30

वनविभाग, महापालिका, महसूल विभाग यांच्यामध्ये अभयारण्याकडे लक्ष कोणी द्यायचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही...

salim ali bird sanctuary pune birds say, put a reservation on our rightful home | डॉ. सलिम अली जयंती विशेष : पक्षी म्हणताहेत, आमच्या हक्काच्या घरावर आरक्षण टाका!

डॉ. सलिम अली जयंती विशेष : पक्षी म्हणताहेत, आमच्या हक्काच्या घरावर आरक्षण टाका!

googlenewsNext

पुणे : येरवडा येथील डॉ. सलिम अली पक्षी अभयारण्य गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत पक्ष्यांसाठी नंदनवन ठरत आलेले आहे. परंतु, या पक्ष्यांच्या घराचा मालकी हक्क नक्की कोणाकडे आहे, त्याच्यावरच वाद सुरू आहे. वनविभाग, महापालिका, महसूल विभाग यांच्यामध्ये अभयारण्याकडे लक्ष कोणी द्यायचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. येथील पक्षीदेखील आता म्हणत असतील, आमचा अधिवास असलेल्या अभयारण्यावर कोणीतरी आरक्षण टाका हो! कारण त्या अभयारण्याला कोणीच वाली राहिलेला नाही.

या पक्षी अभयारण्यात शंभरहून अधिक विविध प्रजातींचे पक्षी पहायला मिळतात. या ठिकाणी जलाशय, दलदल आणि झाडे यामधील पक्षी आहेत. हिवाळ्यात येथील पक्ष्यांची संख्या वाढते. हा पक्ष्यांचा अतिशय चांगला अधिवास आहे. हा अधिवास टिकावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून पक्षी संशोधक धर्मराज पाटील प्रयत्न करत होते; पण काही महिन्यांपूर्वी त्यांचा आकस्मित मृत्यू झाला. त्यांच्या पुढाकाराने फेब्रुवारीमध्ये तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या अभयारण्याला भेट दिली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना अभयारण्य संरक्षित करण्यासाठी आदेश दिले होते. तसेच वनविभागाने अभयारण्याची जागा ताब्यात घेऊन ते संरक्षित करावे, असेही त्यांनी त्यावेळी सांगितले होते. परंतु, त्यानंतर महापालिकेकडून त्यावर काहीच हालचाली झालेल्या नाहीत.

पक्ष्यांची संख्या होतेय कमी

अभयारण्याला लागून मुठा नदी वाहते. त्यात वर्षभर घाण पाणी असते. त्यामुळे पक्ष्यांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. पाण्यात ऑक्सिजन नाहीच. त्यामुळे स्वच्छ पाण्यावर जगणाऱ्या पक्ष्यांनी या अभयारण्याकडे पाठ फिरवली आहे. अभयारण्याला कोणीच वाली नसल्याने तिथे अनेक गैरप्रकारही सुरू असतात. तिथे कचरा टाकला जातो.

सुरक्षा रक्षकही नाही नेमले

अभयारण्यात कचरा टाकणे, दारू पार्ट्या होणे आदींना आळा बसावा म्हणून तिथे महापालिकेने सुरक्षा रक्षक नेमावेत, अशी मागणी खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यावरही महापालिकेने काहीच केले नाही.

पक्षी अभयारण्याची जागेवरून वाद आहेत. महसूल विभाग, वनविभाग, महापालिका आणि वाडिया म्हणून एक गृहस्थ आहेत. यांच्यात चर्चा सुरू असल्याने वाद काही मिटलेला नाही.

- अशाेक घोरपडे, उद्यान अधीक्षक, महापालिका

Web Title: salim ali bird sanctuary pune birds say, put a reservation on our rightful home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.