पुण्यातही रविवारपासून सलून होणार सुरू; पालिका आयुक्तांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 04:51 PM2020-06-27T16:51:28+5:302020-06-27T17:05:11+5:30
सलून दुकाने सुरू करण्याबाबत शासनावर दबाव वाढत चालला होता..
पुणे : राज्यातील केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर शनिवारी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनीही याबाबतचे आदेश दिले आहेत. केवळ पूर्व नियोजित वरील निश्चित करून ठरवून दिलेल्या अटी व शर्तींनुसारच दुकाने उघडता येणार आहेत. या आदेशामुळे नाभिक व्यावसायिक यांना दिलासा मिळाला असून चार महिन्यांनंतर सलून आणि ब्युटी पार्लर खुले होणार आहेत.
ही दुकाने सुरू करण्याबाबत शासनावर दबाव वाढत चालला होता. नाभिक संघटनांसह सामाजिक संघटनांनी याविषयी निवेदने आणि पत्रव्यवहार करीत नाराजी व्यक्त करायलाही सुरुवात केली होती. 'अनलॉक'च्या चौथ्या टप्प्यात ही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुकानांमध्ये केवळ केश कापणे, केसांना रंग देणे, वॅक्सिंग, थ्रेडिंग इत्यादी सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्वचेशी निगडीत कोणत्याही प्रकारची सेवा देता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. कोणत्या सेवा देता येणार आहेत किंवा देता येणार नाहीत याची माहिती दुकानावर माहिती फलकाद्वारे प्रदर्शित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दुकानातील कर्मचाऱ्यांनी हातमोजे, एप्रन आणि मास्क आदी सुरक्षा साधनांचा वापर करणे अत्यावश्यक आहे. दुकानात सर्व ठिकाणी, खुर्च्या, दुकानातील मोकळी जागा, फरशी आदी गोष्टी दर दोन तासांनंतर सॅनिटाईज करूम घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुकानात येणा-या ग्राहकांसाठी केवळ एकदाच वापरता येणा?्या (डीस्पोजेबल) टॉवेल, नॅपकिन वापर करावा. जी उपकरणे एकदा वापरण्याजोगी नाहीत (नॉन डीस्पोजेबल) अशी साधने प्रत्येक सेवेनंतर सॅनिटाईज करणे तसेच त्याचे निजंर्तुकीकरण करणे आवश्यक आहे.
अशा प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक दुकानावर कोरोनासंदर्भात काळजी घेण्यासंदर्भात तसेच जनजागृतीबाबत नोटीस ग्राहकांच्या काळजीसाठी दर्शनी भागात लावणे आवश्यक असल्याचे गायकवाड यांनी आदेशात नमूद केले आहे.