पावसासाठी मिठाचा धूर अन् वरूणराजाची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 04:35 PM2019-08-30T16:35:34+5:302019-08-30T16:36:20+5:30
बारामतीच्या जिरायती भागात गेल्यावर्षी बासरी वाजून पाऊस पाडण्याचा प्रयोग झाला होता...
चंद्रकांत साळुंके
काऱ्हाटी : सततच्या दुष्काळामुळे बारामतीचा जिरायती भाग होरपळून निघाला आहे. पावसाळा संपत आला, तरी हा परिसर कोरडाच राहिला. घोटभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येथील जनतेवर आली आहे. आता तर पाऊस पाडण्यासाठी केविलवाणी धडपड देखील या भागात सुरू झाली आहे. काºहाटी येथील महिलांनी पाऊस पडावा म्हणून पालापाचोळ्याचा व मिठाचा धूर करीत वरूणराजाची याचना केली अन् काय ज्या भागात प्रयोग केला गेला, त्याठिकाणी ढग जमा झाले त्या ठिकाणी अचानक रिमझीम पावसाला देखील सुरुवात झाली.
बारामतीच्या जिरायती भागात गेल्यावर्षी बासरी वाजून पाऊस पाडण्याचा प्रयोग झाला होता. तशा दंतकथा इतिहासात प्रसिद्ध आहेत; मात्र या भागावर वरूणराजा कायम रुसलेला राहिला आहे. सध्याच्या स्थितीत मराठवाडा परिसरात सध्या कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू आहे. मिठाच्या धुरामुळे पाऊस पडतो, असे येथील नागरिकांनी ऐकले होते. दुष्काळाच्या दुष्टचक्रातून मुक्ती मिळावी अन् पाण्याची पायपीट थांबावी, यासाठी येथील महिलांनी एकत्र वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी पालापाचोळा जाळून मिठाचा धूर करण्याचे ठरवले. जिरायती भागात पावसाळ्यामध्ये पाऊस नसल्यामुळे शेतातील कांदा, बाजरी, मका आदी पिके जळून चालली आहेत. यामुळे गणेशनगर येथील बचत गटातील फुलाबाई साळुंके, रुक्मिणी साळुंके, अलका साळुंके, साधना साळुंके, अर्चना साळुंके, शिल्पा साळुंके, विजया साळुंके, सुलोचना साळुंके, पूजा वाबळे, प्रिया साळुंके, राधिका साळुंके आदी महिलांनी एकत्र येऊन पावसासाठी परंपरागत प्रयोग करण्याचे ठरवले.
महिलांनी शेतातील काढलेले गवत, तसेच ओला पालापाचोळा मोठ्या प्रमाणात एकत्र केला व तो पालापाचोळा अवकाशात काळे ढग जमा झाल्यावर पेटवला. त्यात मिठाचा शिडकाव करण्यात आला. त्यामधून मोठ्या प्रमाणात निघालेला धूर उंच जाऊ लागला. वरूणराजानेही महिलांचा हा प्रयत्न बघत भरून येत या परिसरातील जळकेवाडी, भिलारवाडी परिसरात हलक्या स्वरूपात बरसला. काही वेळाने प्रयोग केलेल्या काºहाटी परिसरात देखील रिमझीम पावसाला सुरुवात झाली. हलक्या स्वरूपात का होईना पाऊस झाल्याने येथील नागरिक आनंदी होते.
पाऊस-पाण्यासाठी करण्यात येणारा हा प्रयोग अगदी साधा सोपा आहे. पूर्वी लोक गावाबाहेर येत असे ढोल-लेझीमच्या आवाजामध्ये पावसाला आडवे जात; तसेच बासरी वाजून पाऊस पाडण्याचा प्रयोग देखील याच भागात केला गेला आहे. अशाच पद्धतीत मिठापासून धूर तयार करू मिठामध्ये असलेल्या सोडियम ढगांमध्ये गेल्यामुळे वाफेचे पाण्यात रूपांतर होते व पाणी जड असल्यामुळे पाऊस पडतो, अशी उदाहरणे आहेत असे माजी मुख्याध्यापक के. के. वाबळे यांनी सांगितले.