इमानदारीला सलाम! मालकाच्या रक्षणासाठी कुत्र्यांचा थेट बिबट्यावर हल्ला; पुरंदर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 11:37 AM2021-02-19T11:37:27+5:302021-02-19T11:39:05+5:30
मालकाचा जीव वाचवण्यासाठी कुत्र्यांनी लावली जीवाची बाजी....
परिंचे : कुत्र्याच्या इमानीपणावर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. कुत्र्याचा हाच गुण म्हणून पाळीव प्राण्यांमध्ये कुत्र्याला सर्वाधिक पसंती असते आणि तो त्याला मालकाचा सर्वात लाडका असतो. वेळप्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून कुत्रा मालकाचे प्राण वाचवतो असे तुम्ही ऐकले असेल मात्र पुरंदर तालुक्यातील मांढर गावानजीकच्या शिंदेवाडीत घडली.
शिंदेवाडी परिसरातील शेतकरी विश्वास शंकर पापळ हे त्यांच्या शेतातील गुरांना पाणी पाजण्यासाठी निघाले होते. त्यावेळी झाडावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने विश्वास यांच्यावर उडी मारली व डोक्याला ओरखडले पापळ यांनी त्याच्या हल्ला परतविण्यासाठी त्याच्याशी झटापट करत आरडाओरड केली त्यावेली त्यांच्या शेतातील दोन्ही कुत्रे त्यांच्या मदतीसाठी धाऊन आले व बिबट्यावर हल्ला चढविला. दोन्ही कुत्र्यांनी एकदमच हल्लाकेल्यामुळे बिबट्या व कुत्र्यांमध्ये काहीवेळ झटापट सुरु झाली मात्र काही वेळात बिबट्याने दोन्ही बहाद्दर कुत्र्यासमोर अक्षरश: शेपूट घालून पळ काढला, त्यामुळे विश्वास यांनी सुटकेचा निश्वास सोडला. या झटापटीत विश्वास यांच्यासह त्यांचे दोन्ही कुत्रे जखमी झाले. विश्वास यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
याबाबत ग्रामस्थांनी तातडीने माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना घटनेची माहिती दिली. शिवतारे यांनी याबाबत सासवड ग्रामीण रुग्णालय व परिंचे प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधला. मात्र यासाठीची लस केवळ ससूनला उपलब्धअसल्याने जखमीला ससूनला उपचारासाठी पाठविण्यात आले. ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तावरे यांना तत्काळ सूचना देत पुढील उपचार करण्याच्या सूचना शिवतारे यांनी दिल्या.
--
गेल्या आठवड्यात पांगारे येथे बंदिस्त गोठ्यात बांधलेली दोन वासरे बिबट्याने फस्त केली आहेत. पांगारे, हरगुडे, टोणपेवाडी, शिंदेवाडी, मांढर, धनकवडी, दवणेवाडी परिसरात बिबट्याची दहशत असून अनेक जनावरे बिबट्याच्या हल्लात मरण पावली आहेत.