सलाम कष्टकरी महिलांच्या प्रामाणिकपणाला... आमच्या खात्यात जमा झालेले पैसे परत घ्या; शरीरविक्री करणाऱ्या महिलांचे पैसे आम्हाला नकोत म्हणत केले आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:13 AM2021-04-30T04:13:56+5:302021-04-30T04:13:56+5:30
विविध मांगण्यांसाठी होणारी आंदोलने जिल्हाधिकारी कार्यालयाला नवी नाहीत. पण गुरूवारी मोलमजुरी, घरकाम करणार्या कष्टकरी स्त्रीयांनी केलेल्या आंदोलनाने जिल्हाधिकारी कचेरीतील ...
विविध मांगण्यांसाठी होणारी आंदोलने जिल्हाधिकारी कार्यालयाला नवी नाहीत. पण गुरूवारी मोलमजुरी, घरकाम करणार्या कष्टकरी स्त्रीयांनी केलेल्या आंदोलनाने जिल्हाधिकारी कचेरीतील अधिकारीही चकित झाले. ज्यांच्याकडे गमविण्यासारखे काहीच नव्हते, अशा या कष्टकरी स्त्रीयांनी आज जिल्हाधिकारी कचेरीवर प्रातिनिधिक निदर्शने केली. धक्कादायक म्हणजे एका स्वयंसेवी संस्थेने कष्टकरी महिलांना फसवून शरीरविक्री करणाऱ्या महिलांसाठीच्या योजनेतून पैसे मिळवून दिले होते.
स्वयंसेवी संस्थेकडून महिलांची फसवणूक
करोनाने गाजलेल्या, टाळेबंदीने पिडलेल्या व रोजगार सुटलेल्या सध्याच्या अवस्थेत स्वयंसेवी संस्थेच्या म्हणविणाऱ्या तीन महिलांनी हडपसर भागातील घरकामगार, मोलकरीण, कष्टकरी महिलांना गाठले. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या योजनेतून घरकामगार/मोलकरीण यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत करणार आहोत. त्यासाठी तुमचे आधारकार्ड, फोटो, रेशनकार्ड व बँकेचे पासबुक द्या. काही दिवसातच १५,००० रुपये जमा होतील. त्यातील निम्मे आम्हाला परत करावे लागतील. संस्थेच्या महिलांनी दिलेले आश्वासन त्यांना खरे वाटले. या महिला दलित त्यामुळे अल्पशिक्षित, निरक्षर असल्याने त्यांनीही आपली वरील कागदपत्रे विश्वासाने संस्थेच्या महिलांच्या हवाली केली आणि हाताचे अंगठेही दिले. त्यांना 23 एप्रिलरोजी काही महिलांच्या खात्यावर १५ हजार रुपये जमा झालेही. त्यानंतर संस्थेच्या महिला व इतर काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे ७,५०० मागण्यास सुरुवात केली. काही जणींनी त्यांना रु. ७,५०० दिलेही. दरम्यानच्या काळात शरीरविक्री व्यवसायात असणाऱ्या महिलांच्या खात्यात जिल्हाधिकारी यांनी प्रत्येकी रु. पंधरा हजार जमा केल्याचा उल्लेख होता. वस्तीतील महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मोबाईलवर आलेल्या मेसेजमध्येही जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडून हे पैसे जमा झाल्याचा मजकूर आहे. त्यामुळे या प्रकाराचा उलगडा झाला. शरीरविक्री करणाऱ्या स्त्रियांच्या योजनेचे पैसे शरीरविक्री न करता इतर कष्टाची कामे करणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा झाल्याची कष्टकरी महिलांची खात्री झाली. या फसवणुकीने संतप्त होऊन सामाजिक कार्यकर्ते नितिन पवार व अखिल भारतीय बहुजन सेनेचे संस्थापक नीलेश वाघमारे यांना आपली कैफियत ऐकवली. त्यांच्या नेतृत्वाखाली आपला आत्मसन्मान टिकविण्यासाठी जिल्हाधिकारी कचेरीवर निदर्शने केली. अप्पर जिल्हादंडाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांची भेट घेवून त्यांना झाल्याप्रकाराबद्दल निवेदन दिले.
आमची नावे लाभार्थी योजनेतून कमी करा, पैसे परत घ्या
शरीर विक्री करणाऱ्या भगिनींविषयी पूर्वग्रह न बाळगताही, सहानुभूती ठेवत असताना या मार्गाने उदरनिर्वाह करणे कष्टकरी स्त्रियांना योग्य वाटत नाही. तसेच त्यामुळे हा व्यवसाय करणाऱ्या स्त्रीयांच्या यादीत लाभासाठीही असेल नाव येणे हे आमचा आत्मसन्मान पायदळी तुडविण्यासारखे आहे. म्हणून जमा झालेले हे पैसे आम्ही कष्टकरी महिला पैसे काढण्याच्या स्लिपद्वारे आपल्याला परत करत आहेत. त्याचा स्वीकार करावा तसेच या महिलांच्या योजनेतील त्यांची नावे लाभार्थी योजनेतून कमी करावीत. कसलीही शहानिशा न करता दिले जात असलेल्या या अनुदानाची व अश्या फसवणुकीची चौकशी करावी अशी मागणी महिलांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे खाते तपशील आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला दिले. त्यात हे पैसे परत करण्याची सोय उपलब्ध करून दिली. तसेच ज्यांचे पैसे जमा होतील, त्यांच्या प्राप्त तपशीलानुसार लाभार्थ्यांच्या यादीतून त्यांची नावे कमी केली जातील. या प्रकाराची चौकशी करून कारवाईची मागणी करणारे निवेदन पोलिस उपयुक्त परिमंडल क्र. 5 नम्रता पाटील व वानवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनाही देण्यात आले.
सत्यशोधन समिती स्थापन करण्याची मागणी
या शरीरविक्री करणाऱ्या स्त्रियांमध्ये काम करणाऱ्या सहेली संस्थेच्या संचालक तेजस्वीनी सेवेकरी यांनी कष्टकरी महिलांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. शरीरविक्री करणाऱ्या महिलांमध्ये काम करणार्या खऱ्या प्रतिनिधींचा समावेश असलेली सत्यशोधन समिती तात्काळ स्थापन करून चौकशी आणि कारवाई करावी. असे त्या म्हणाल्या, अशी मागणी त्यांनी केली.
-----------------
शरीरविक्री करणाऱ्या महिलांच्या अनुदानावर डल्ला
शासनाच्या देहविक्री करणाऱ्या महिलांना ओळखपत्र व कागदपत्रांची अट न टाकल्याचा गैरफायदा पुण्यातील काही तथाकथित सामाजिक संस्थांनी घेतला आहे. झोपडपट्टी भागातील अशिक्षित महिलांचे स्लम डेव्हलपमेंटच्या नावाखाली अर्ज भरून ते देहविक्री करणाऱ्या महिला म्हणून जमा केले. त्यानुसार प्रत्येक महिलेच्या खात्यावर हा निधी जमा झाल्यानंतर संबंधित कार्यकर्ते त्यापैकी ५० ते ६० टक्के रक्कम परत मागत आहेत. त्यामुळे हा गंभीर प्रकार उजेडात आला असून, आम्ही देहविक्री करणाऱ्या महिला नसून, कष्टकरी महिला असल्याची तक्रार संबंधित महिलांनी जिल्हाधिकारी व महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.