नागफणी पॉइंटवरून हुतात्मा राजगुरूंना वंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:13 AM2021-08-24T04:13:36+5:302021-08-24T04:13:36+5:30
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देशासाठी हसत हसत फासावर जाऊन हौतात्म्य पत्करलेल्या वीर राजगुरूंचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान खूप मोठे होते. अशा ...
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देशासाठी हसत हसत फासावर जाऊन हौतात्म्य पत्करलेल्या वीर राजगुरूंचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान खूप मोठे होते. अशा या थोर क्रांतिकारकांची जयंती मोठ्या उत्साहात गिर्यारोहकांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली. भोरगिरी भीमाशंकर नागफणी पॉइंट ते पुन्हा भोरगिरी या तब्बल २१ किलोमीटर मोहिमेची सुरुवात कोटेश्वर मंदिर (भोरगिरी, ता. खेड), येथून झाली. शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा खड्या चढाईचा मार्ग, संततधार पाऊस, धुक्यात हरवलेला परिसर, निसरडी व चिखलमय पाऊलवाट, शेवाळलेले खडक, ओले कातळकडे अशी अनेक आव्हाने या मोहिमेत होती. अखेर सर्व आव्हानांना सामोरे जात सागर टावरे, शुभम चव्हाण, मनोज रौंधळ, मयूर गिधे, आकाश मुसुंडे, गणेश जाधव, ओंकार बारवेकर, ओंकार रौंधळ, मारुती राजगोळकर या गिर्यारोहकांनी अभिमानाने तिरंगा फडकावित हुतात्मा राजगुरूंना वंदन करीत देशभक्तीच्या भावनेने मोठ्या उत्साहात अनोख्या पद्धतीने हुतात्मा राजगुरू जयंती साजरी केली.
शिवाजी महाराजांच्या धैर्याला स्मरण करण्यासाठी स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरदार पिलाजी गोळे यांचे १४वे वंशज मारुती आबा गोळे यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी मावळे आग्रा ते राजगड हे १३०० किलोमीटरचे अंतर पायी धावत १३ दिवसांत पूर्ण करीत आहेत. सध्याच्या करोना महामारीतील निराशाजनक वातावरणात राज्याने, देशाने प्रगतीची एक गरुडझेप घ्यावी हाच या गरुडझेप मोहिमेचा उद्देश असल्याचे सांगितले.