26/11 Mumbai Attack: पुणे शहर पाेलिसांकडून 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 01:56 PM2018-11-26T13:56:39+5:302018-11-26T13:58:48+5:30
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या शाैर्याचे प्रतिक म्हणून उभारण्यात अालेल्या स्तंभाला बॅंडच्या माध्यमातून मानवंदना देण्यासाठी पुणे पाेलीस दलासह पुणेकर माेठ्या संख्येने सारसबागेत जमा झाले हाेते. शहीद सैनिकांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून उभारलेल्या स्तंभाला बँडच्या ठेक्यामध्ये मानवंदना देत त्यांच्या हौताम्याला पुणे पोलिसांनी सलाम केला.
पुणे : 26 नाेव्हेंबर 2008 हा दिवस भारताच्या इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाताे. या दिवशी लष्करे तैयब्बा या अतिरेकी संघटनेने मुंबईवर हल्ला करुन शेकेडाे निरपराध लाेकांचे बळी घेतले. या दहशतवाद्यांशी लढताना अनेक पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वीर मरण अाले. याच दिवसाचे स्मरण करत या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या शाैर्याचे प्रतिक म्हणून उभारण्यात अालेल्या स्तंभाला बॅंडच्या माध्यमातून मानवंदना देण्यासाठी पुणे पाेलीस दलासह पुणेकर माेठ्या संख्येने सारसबागेत जमा झाले हाेते. शहीद सैनिकांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून उभारलेल्या स्तंभाला बँडच्या ठेक्यामध्ये मानवंदना देत त्यांच्या हौताम्याला पुणे पोलिसांनी सलाम केला. पोलिसांनी दिलेली मानवंदना अनुभवताना उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आणि भारत माता की जय...चा जयघोष करुन पोलिसांसह उपस्थित नागरिकांनी अशा दहशतवादी शक्तींचा सामना करण्याकरीता एकत्र राहण्याचा निर्धारही केला. पोलिसांसह शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून शहिदांना चित्ररुपी श्रद्धांजली अर्पण केली.
मुंबईमध्ये २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे सारसबागेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम्, महापौर मुक्ता टिळक, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, यांसह सर्व झोनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. चित्रकला स्पर्धेचे यंदा ६ वे वर्ष होते. यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचनही करण्यात आले.
के.व्यंकटेशम् म्हणाले, पुणे शहर हे भारताच्या संरक्षण क्षेत्रात आणि सर्वांगिण प्रगतीमध्ये अग्रेसर आहे. त्यामुळे मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहण्यातही आम्ही पुढे आहोत. मुंबईत झालेली २६/११ ची घटना मोठी होती. परंतु त्यानंतर आता आपण अधिक सक्षम झालो आहोत. कोणत्याही संकटाला तोंड देण्याची क्षमता आपल्यामध्ये असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. शिरीष मोहिते म्हणाले, पोलीस दलातर्फे बँडच्या माध्यमातून शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यासोबतच जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचा-यांनी दाखविलेल्या धाडसाला मानवंदना देण्यासाठी पुण्यातील पोलीस दलाच्या पुढाकाराने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. तसेच देशभक्तीपर व पर्यावरण जागृतीच्या कल्पना विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून मांडाव्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत होण्यासोबतच शहिदांना श्रद्धांजली अर्पण करावी, यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दृष्टीहिन मुलांनी देखील यात सहभाग घेतला.
चित्रकला स्पर्धा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला प्रशस्तीपत्रक देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण विवेक खटावकर,जयंत टोले, संदीप गायकवाड, नितीन होले, संतोष महाडिक यांनी केले. खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. जादूगार भुजंग यांचे जादूचे प्रयोग देखील यावेळी आयोजित करण्यात आले होते. डॉ. मिलींद भोई यांनी सूत्रसंचालन केले.