सलाम पोलीस ; सेवानिवृत्त झाले ड्युटीवर ; नोकरीच्या शेवटच्या क्षणापर्यंत कामावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 08:50 PM2020-04-02T20:50:07+5:302020-04-02T20:58:36+5:30
सेवानिवृत्तीजवळ आली की सर्व जण असलेल्या सुट्ट्या संपविण्याच्या मागे लागतात, तर काही ऑफिसमध्ये केवळ शरीरानेच असतात़ असे असताना शहर पोलीस दलातील तीन अधिकारी मात्र, सेवानिवृत्तीच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्या कर्तव्यावर हजर होते़.
पुणे : सेवानिवृत्तीजवळ आली की सर्व जण असलेल्या सुट्ट्या संपविण्याच्या मागे लागतात, तर काही ऑफिसमध्ये केवळ शरीरानेच असतात़ असे असताना शहर पोलीस दलातील तीन अधिकारी मात्र, सेवानिवृत्तीच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्या कर्तव्यावर हजर होते़. त्यातील एका जणाला तर वरिष्ठ थेट रस्त्यावर बंदोबस्तात असताना रात्री साडे सात वाजता निरोप दिला व तसे वरिष्ठांना कळविले.
दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी पोलीस आयुक्तालयात सेवा निवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी यांचा कुटुंबियांसमवेत स्नेह मेळावा आयोजित केला जातो. त्यात स्वत: पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकारी त्यांच्या आजवरच्याकामाबाबत सत्कार करुन त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतात. यंदाचा मार्च महिना अपवाद ठरला. कोरोना विषाणूमुळे शहरात लॉक डाऊन असल्याने हा समारंभ झाला नाही. त्यातील काही जण तर चक्क शेवटच्या दिवशीही सायंकाळपर्यंत ड्युटीवर होते.
मुंढवा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार बापू सुदाम शिंदे हे ताडी गुत्ता चौकात नाकाबंदीवर शेवटच्या दिवशी होते. संपूर्ण दिवस ड्युटी त्यांनी चौकात नाकाबंदी केली. सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते हे नाकाबंदीची तपासणी करीत ३१ मार्चला सायंकाळी सव्वा सात वाजता चौकातच कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. चौकातच बंदोबस्तावर असताना विधाते यांनी बापू शिंदे यांच्यासमवेत फोटो काढला आणि तेथेच पोलीस दलातून निवृत्त होत असल्याचे सांगितले. तसा निरोप त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला.एस टी बस भरधाव चालवून ९ जणांचे प्राण घेणाऱ्या संतोष माने खटल्यात बापू शिंदे यांनी न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यात संतोष माने याला फाशीची शिक्षा झाली होती. शिंदे हे १९८१ मध्ये पोलीस शिपाई म्हणून पुणे शहर पोलीस दलात भरती झाले. ३९ वर्षाच्या सेवेनंतर ते कर्तव्य बजावत निवृत्त झाले.
पोलीस उपनिरीक्षक सुभाष तागड हे सेवानिवृत्तीच्या दिवसापर्यंत बंदोबस्तावर होते. अडीच महिन्यांची रजा शिल्लक असताना लॉकडाऊनमुळे शेवटच्या दिवसांपर्यंत कार्यरत होते. सध्या ते गुन्हे शाखेत नेमणूकीला होते. निवृत्तीचा दिवस असताना त्यांनी ३० मार्चला रात्री मार्केटयार्डमध्ये रात्रपाळी केली़. रात्रभर भाजीपाला घेऊन येणारे ट्रक, टेम्पो यांच्यामुळे गर्दी होऊ नये, म्हणून त्यांना थांबून थांबून सोडण्याचे काम सकाळपर्यंत केले. त्यानंतर कार्यालयात जाऊन आपल्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्व्हर व इतर बाबी सुपूर्त केल्या. सायंकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली़. पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ सोडणवर हेही सेवानिवृत्तीच्या दिवशी दिवसभर पोलीस नियंत्रण कक्षात आपल्या कर्तव्यावर होते. पूर्ण ८ तासाची ड्युटी केल्यानंतर त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना निरोप दिला.