'कडक सॅल्यूट'! अपंग असूनही संचारबंदीच्या काळात पुणे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून 'ड्युटी' बजावणारा 'राजा'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 11:51 PM2021-05-24T23:51:14+5:302021-05-24T23:53:14+5:30
राजा’ नाकाबंदीतील विशेष पोलीस अधिकार्यांची सर्वांना भुरळ
पुणे : ग्रामीण भागातल्या रानवस्त्यांपासून ते पोलीस दलाच्या शोध पथकापर्यंत अशा सर्वच ठिकाणी श्वान हा प्राणी प्रामाणिकपणासाठी ओळखला जातो. कथा, कादंबरी,सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांसह आजूबाजूला घडणाऱ्या अनेक संकटकालीन प्रसंगांमध्ये श्वानांच्या इमानदारीवर शिक्कामोर्तब होते. तसेच पोलिसांना देखील मोठमोठ्या गुन्ह्यांचा उलगडा लावण्यात श्वानाने महत्वाची भूमिका बजावलेली आपण पाहिलेली आहे. पण एका पायाने अपंग असून देखील कोरोना संचारबंदीच्या काळात असाच एक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून दिवसरात्र 'ड्युटी' करणाऱ्या ''राजा' गेल्या दोन दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे.
पुणे शहरातील कोरोना लॉकडाऊन काळात पोलिसांकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी सुरु आहे. बंदोबस्तासाठी विशेष पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे. त्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथील नाकाबंदीत एक विशेष पोलीस अधिकारीही पोलिसांच्या बरोबर बंदोबस्तात सहभागी झाला आहे. त्याचे नाव ‘राजा’ आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दोन दिवसांपूर्वी पोलिसांबरोबर कायम दक्ष असलेल्या या तीन पायावा श्वान नाकाबंदीदरम्यान हजर असल्याचे ट्वीट केले होते. त्याचे अनेकांनी कौतुक केले. अभिनेता जॉन अब्राहिम याने रिट्वीट करीत ट्रायपॉड राजाचे कौतुक केले आहे.
बालगंधर्व रंगमंदिर चौकात लावलेल्या नाकाबंदीत पोलीस अधिकारी, कर्मचार्यांसोबत राजाही दक्ष असतो. हा राजा नेमका कसा व कोठून आला, याची कोणाला माहिती नाही़. पोलीस बंदोबस्तावर उभे राहिल्यावर राजाही तेथे येऊन उभा रहात असे. हळु हळू पोलिसांना त्याचा लळा लागला. ते आपल्या डब्यातील पोळी तसेच बिस्किट त्याला खायला देऊ लागले. तो या पोलिसांबरोबर सायंकाळी आणि रात्री दक्ष राहू लागला. येणार्या जाणार्या वाहनांवर लक्ष ठेवू लागला.
डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले की, नाकाबंदीत हा आमच्याबरोबरचा खास दोस्त बनला आहे. तो विशेष पोलीस अधिकार्यांपेक्षा कोठेही कमी नाही.
पोलीस आयुक्त गुप्ता यांच्या ट्विटनंतर अनेक जण खास राजाला पाहायला बालगंधर्व रंगमंदिर येथे येऊन त्याचे कौतुक करत आहेत.