सॅल्यूट!वडिलांच्या निधनांनंतर २४ तासांच्या आत पुन्हा कर्तव्यावर रुजू होणारा 'आरोग्यदूत'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 01:03 PM2021-05-04T13:03:21+5:302021-05-04T13:23:42+5:30
गेल्या वर्षभरात हजारांवर कोरोना रुग्णांना त्यांनी अगदी ठणठणीत बरे केले. पण जेव्हा कोरोना घराचा उंबरठा ओलांडून आत आला तरीदेखील त्यांनी आपल्यातल्या डॉक्टरांचं कर्तव्य आधी निभावलं....
नेहा सराफ
पुणे : कोरोना काळात असंख्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखातून सावरणं तसं महत्कठीण आहे.पण कर्तव्यनिष्ठ माणसाला कितीही मोठं दुःख आणि संकट जास्त काळ गोंजारता येत नाही, किंबहुना तसे करण्याची परवानगी कर्तव्य त्याला देत नाही असंच काहीसं म्हणावे लागेल. पुण्यातील संजीवन रूग्णालयात कोरोना रुग्णांच्या सेवेत त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. वर्षभरात त्यांनी हजारांवर कोरोना रुग्णांना ठणठणीत बरे केले. पण जेव्हा कोरोना घराचा उंबरठा ओलांडून आत आला तरीदेखील त्यांनी आपल्यातल्या डॉक्टरांचं कर्तव्य आधी निभावलं. हे कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व आहे संजीवन हॉस्पिटलचे डॉ. मुकुंद पेनुरकर..
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील वैद्यकीय सेवेतील आरोग्यदूत आपल्या जीवाची बाजी लावून कोरोना विरुद्व लढताहेत. कुणाही कुटुंबाला आपली व्यक्ती गमावण्याची वेळ येऊ नये यासाठी अहोरात्र झटताहेत.. त्यापैकीच एक डॉ. मुकुंद पेनुरकर हे देखील आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांचा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अखंड धावपळ सुरु आहे. पण याच दरम्यान हे कोरोना संकट अगदी घरापर्यंत येऊन धडकलं.डॉ पेनूरकर यांच्या आई वडिलांसह भावालाही कोरोनाची लागण झाली. पण यात दुर्दैवाने वडिलांना वाचवण्यात त्यांना यश आलं नाही. वडिलांचे तर निधन झाले होते पण त्यानंतर इतरांनी आपले आप्त गमवू नये म्हणून 24 तासांच्या आत कौटुंबिक दुःख बाजूला सारून डॉ. पेनूरकर पुन्हा रुग्णसेवेसाठी हजर झाले.
डॉ. पेनूरकर म्हणाले, वडील नागपूरमध्ये होते.मात्र तिथेही वैद्यकीय सुविधा मिळण्यास अडचणी येत होत्या.दुसरीकडे इथल्या रुग्णांचे उपचार थांबवून नागपुरला निघून जाणेही शक्य नव्हते. अखेर कार्डिअक अम्ब्युलन्सने त्यांनी वडिलांना पुण्यात दाखल केलं मात्र दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. हे सगळं इथेच संपलं नाही तर वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यास डॉक्टर पेनूरकर एकटे गेले होते. तिथे त्यांनी बहीण आणि घरच्यांना व्हिडीओ कॉल केला. त्याच वेळी आई आणि भावावर आयसीयूमध्ये उपचारही सुरू होते. आता त्यांचे आई आणि भाऊ बरे होत आहेत. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणाऱ्या पेनूरकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोनाचे संकट गहिरे झालेले असताना त्यातून डॉ.पेनूरकर यांच्यासारख्या कोरोना योद्धयांचा त्याग मोठा आहे. वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत डॉ. पेनूरकरांची ही कृती त्यांच्यातील धन्वंतरीची जाणीव करून देते असंच म्हणायला हवं.