जिंकलंस भावा! रुग्णवाहिका चालकाची थोर माणुसकी; ३३२ कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 06:31 PM2021-04-30T18:31:21+5:302021-04-30T19:13:26+5:30
कितीही मोठं मोठी संकटे आली तरी पुरून उरते माणुसकी...
नारायणगाव: कोरोनामुळे सर्वत्र बिकट अवस्था निर्माण झाली आहे. मृत होत असलेल्यांची संख्या वाढत चालली आहे. अशा या विदारक परिस्थितीमध्ये मृत कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कारासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कोण अंत्यसंस्कार करणार असा प्रश्न निर्माण होत आहे. पण अशावेळीच संकटकाळी माणुसकीचे पाईक पुढे येतात. नारायणगाव येथील अशाच एका सेवकाने ३३२ कोरोनाग्रस्तांचे अंत्यसंस्कार केले आहेत. संजय भागुजी भोर असे त्यांचे नाव आहे.
संजय भोर (वय ३८) हे रुग्णवाहिका चालक आहेत. आई, बहीण व पत्नी असा त्यांचा परिवार आहे. गेल्या एक वर्षापासून नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात ते कार्यरत आहे. वर्षभरापासून नागरिकांच्या डोक्यावर कोरोना संकटाची टांगती तलवार आहे. सुरुवातीला कोरोनाग्रस्त असल्याचे समजल्यावर त्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला जायचा. जवळचे नातेवाईकही कोरोनाबाधिताजवळ जाण्यास घाबरत होते. मृत झालेल्या जवळच्या व्यक्तीचा अंत्यविधी कोणी करत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांचे समाज कार्य सुरु झाले. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून तसेच सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यातील ३३२ कोरोनाबाधित रुग्णांचे अंत्यविधी केले आहेत .
केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या वर्षभरापासून ते कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करत आहे. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची ने-आण, त्यांना जेवण, पाणी, गोळ्या देणे, ऑक्सिजनच्या टाक्या आणणे, रुग्णांच्या संपूर्ण देखभाली बरोबरच रुग्णालयाची साफसफाईची कामे ते करत आहेत.
विशेष म्हणजे विना मोबदला घेता ते ही सर्व कामे ते करत आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आणि कोरोना योद्धा म्हणून खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या संजय भोर यांचे सर्वत्र कौतुक होत असून नारायणगाव ग्रामस्थांनी तर त्यांच्या कार्याला सलाम केला आहे .