...त्या हातांना सलाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:36 AM2017-08-15T00:36:47+5:302017-08-15T00:36:51+5:30
त्यांचा दिवस सुरू होतो सकाळी सहालाच, संपतो सायंकाळी साडेसहाला! सूर्योदय ते सूर्यास्त अशा वेळेत ते काम करतात.
पुणे : त्यांचा दिवस सुरू होतो सकाळी सहालाच, संपतो सायंकाळी साडेसहाला! सूर्योदय ते सूर्यास्त अशा वेळेत ते काम करतात. त्यात कधीही खंड पडत नाही. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, ते त्या वेळी येणार व त्यांचे काम करणारच! त्यांना रविवारचीच काय कोणतीही सुटी नसते. न कंटाळता, न थकता, कामचुकारपणा न करता ते आनंदाने आपले कर्तव्य करीत असतात. आनंदाने व अभिमानानेही!
सगळ्या सरकारी इमारतींवर रोजच्या रोज ध्वजारोहण व ध्वजावतरण होत असते. ते करणारे हात असतात जमादार, शिपाई या वर्गातील. वर्षाचे सर्व दिवस ते हे काम करीत असतात. १५ आॅगस्ट व २६ जानेवारी हे दोन दिवस सोडून. या दोन दिवशी महत्त्वाच्या पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. नेमके त्याच दिवशी हे दोन हात विसरले जातात. पण त्यांना त्याची खंत नाही, उलट देशाप्रती रोज सेवा अर्पण करण्याची संधी मिळते आहे याचा आनंद आहे.
महापालिकेच्या इमारतीवर मधुकर घोरपडे, सर्जेराव नागवडे, रमेश कदबाने, अशोक बनकर यांच्याकडे ही जबाबदारी आहे. सूर्योदय व सूर्यास्त यांची वेळ त्यांच्या समोरच्या फलकावर रोज लिहून ठेवलेली असते. ती अर्थातच रोज बदलते. बरोबर त्याच वेळेत मुख्य इमारतीवर जाऊन ध्वजारोहण व ध्वजावतरण ही दोन्ही कामे ते करीत असतात. दोन्ही वेळा झेंड्याला कडक सलामी दिली जाते. त्यांच्याशिवाय अन्य जमादार, शिपाई यांनाही याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. वेळ चुकवायची नाही, हा या कामातील सर्वाधिक महत्त्वाचा भाग. देशाचा झेंडा फडकावताना खरोखरच छाती अभिमानाने फुलून येते, असे या सर्वांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या इमारतीवर गेल्या १२ वर्षांपासून सुरेश
वहिले हे काम करतात. धुवाधार पावसातही ध्वजारोहण व
ध्वजावतरण अशी दोन्ही कामे वेळेवर केली असल्याचे त्यांनी सांगितले. ते मराठा लाईट इन्फंट्रीमधून निवृत्त झाले व नंतर सरकारी सेवेत दाखल झाले. त्यामुळे देशाचा अभिमान तर त्यांच्या नसानसांत भिनलेला आहे. सूर्योदय व सूर्यास्ताची वेळ पाहण्यासाठी त्यांनी एक कॅलेंडरच आपल्या मोबाईलमध्ये घेतले आहे. त्या वेळेनुसार ते बारा वर्षे बरोबर ही दोन्ही कामे न चुकता करतात. कर्तव्य बजावल्याचे समाधान मिळते, असे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये विजय जक्का, रूपेश सोनवणे यांच्याकडे ही जबाबदारी आहे. जक्का सकाळी ध्वजारोहणाचे व सोनवणे ध्वजावतरणाचे काम करतात. दोघांचाही ध्वजसंहिंतेचा खास अभ्यास आहे. ध्वज कसा काढायचा व ठेवायचा याची सर्व माहिती आहे. त्याप्रमाणेच काम करतो असे ते म्हणाले. देशाची अस्मिता असलेला झेंडा फडकावताना व त्याला सलामी देताना मिळते ते समाधान अन्य कोणत्याही कामाने मिळणारे नाही, असे त्यांनी सांगितले.
दिसायला सोपे वाटणारे हे काम प्रत्यक्षात मात्र अवघड आहे. ध्वजसंहितेचे सर्व नियम पाळूनच ते करावे लागते. ध्वजाची घडी कशी घालायची व कशी उलगडायची, यापासून सर्व काही ठरलेले आहे. सूर्यास्तानंतर ध्वज फडकता राहिला तर तो अवमान समजला जातो, त्यामुळे फार काळजीपूर्वक हे काम करावे लागते. ध्वज फडकताना तो बरोबर फडकेल, त्याचा रंगक्रम बरोबर असेल, हेही पाहावे लागते.