संभाजी भिडे, एकबोटेंना सरकारचे पाठबळ - कवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 05:12 AM2018-02-06T05:12:17+5:302018-02-06T05:12:25+5:30
भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी हजारो नि:शस्त्र जनतेवर हल्ला करणा-या हल्लेखोरांना अटक न करता, ३ जानेवारीच्या बंदमध्ये सहभागी दलित, बौद्ध तरुण-तरुणींना कोंबींग आॅपरेशन करून सरकार अटक करीत आहे.
पुणे : भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी हजारो नि:शस्त्र जनतेवर हल्ला करणाºया हल्लेखोरांना अटक न करता, ३ जानेवारीच्या बंदमध्ये सहभागी दलित, बौद्ध तरुण-तरुणींना कोंबींग आॅपरेशन करून सरकार अटक करीत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच संबंधितास अटक करून चौकशी केली पाहिजे, असे कायदा सांगतो. मात्र, सरकार मनोहर ऊर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पाठिशी घालत आहे, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला.
पुण्यात विधान भवन येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर आयोजित धरणे आंदोलनानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कवाडे म्हणाले की, ‘भिडे-एकबोटे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. तरीही ते मोकाट फिरत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा पोलिसांवर दबाव असल्यामुळेच ते त्यांना अटक करीत नसल्याचे दिसत आहे. या दोघांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.’
>२८ फेब्रुवारीला ‘महामोर्चा’
भिडे व एकबोटेंना अटक करावी यासह विविध मागण्यांसाठी भायखळा येथील राणीबाग ते आझाद मैदान दरम्यान येत्या २८ फेब्रुवारीला विविध आंबेडकरी संघटनांचा ‘महामोर्चा’ काढण्यात येणार आहे , असेही प्रा. कवाडे यांनी सांगितले.