संभाजी भिडे, एकबोटेंवर दोषारोपपत्रासाठी प्रस्ताव; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 01:54 AM2021-01-02T01:54:31+5:302021-01-02T06:59:16+5:30
गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे तसेच समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी अद्याप दोघांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले नाही. त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. त्यांच्याबाबत योग्य तो तपास करून रीतसर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
गृहमंत्री देशमुख यांनी येरवडा कारागृहाला शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली. कारागृहातील कैदी कुशल कारागीर आहेत. विविध वस्तू ते तयार करतात. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी विक्रीदालन सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. पाश्चात्त्य देशांप्रमाणे महाराष्ट्रात आधुनिक कारागृह बांधण्याचा तसेच राज्यातील पोलिसांना निवासस्थाने देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहितीही त्यांनी दिली.