Pandharpur Wari: पालखीमार्गात संघटनांचे लोक नकोत : ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रमुखांचे पोलिसांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 04:11 PM2019-06-25T16:11:22+5:302019-06-25T16:13:47+5:30
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. अशा स्थितीत काही संघटनांचे लोक पालखी सोहळ्यात घुसून हा क्रम बिघडवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी प्रशासनाने त्यांना पालखी सोहळ्यात घुसखोरी करू देऊ नये अशी विनंती श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज यांच्यावतीने पुणे पोलिसांनी करण्यात आली आहे
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. अशा स्थितीत काही संघटनांचे लोक पालखी सोहळ्यात घुसून हा क्रम बिघडवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी प्रशासनाने त्यांना पालखी सोहळ्यात घुसखोरी करू देऊ नये अशी विनंती श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज यांच्यावतीने पुणे पोलिसांनी करण्यात आली आहे. मात्र त्यांनी थेट संभाजी भिडे गुरुजी किंवा शिवप्रतिष्ठानचा कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे आता पालखी प्रमुखांच्या विनंतीला पुणे पोलीस कसा प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही वर्षांपासून संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांच्या शिवप्रतिष्ठानचे धारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील वर्षी शहरातील शिवाजीनगर भागात शंभरपेक्षा अधिक धारकरी यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. मात्र स्वतः गुरुजी यांनी पालखीचे दर्शन घेतले होते. त्यावेळीही परंपरा मोडल्याचे मत व्यक्त करत पालखी प्रमुख आणि काही वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
यंदा तर पालखीव प्रमुखांनी पुणे पोलिसांना पत्र लिहून मागील दिलेले पालखी परंपरा न मोडण्याचे आश्वासन पाळण्याची आठवण केली आहे. परंपरेप्रमाणे श्री संत तुकाराम महाराज त्यानंतर श्री संत जगनाडे महाराज त्यानंतर श्री संत गव्हरशेठ वाणी आणि शेवटी श्री संत ज्ञानेश्वर महाराज असा पालख्यांचा क्रम आहे . त्यात काही संघटनांचे लोक घुसतात आणि संतांच्या पालख्यांचा क्रम बिघडतो असे म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी याची काळजी घ्यावी असे म्हटले आहे. आता या पत्राला पुणे पोलीस काय उत्तर देतात याची उत्सुकता आहे.
दरम्यान मागील वर्षीप्रमाणे यंदाही पालखी मार्गात संभाजी भिडे गुरुजी आणि शिवप्रतिष्ठानचे धारकरी सहभागी होणार असल्याचे समजते. दुपारी ते जंगली महाराज मंदिरात एकत्र जमणार असल्याचे समजते.