संभाजी भिडे यांना यंदा पालखी सोहळ्यात प्रवेश करता येणार नाही; पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 05:22 PM2022-06-20T17:22:26+5:302022-06-20T17:34:55+5:30
संचेती हॉस्पिटलजवळ संभाजी भिडे धारकऱ्यांसहित पालखी सोहळ्यात सहभागी होतात
पुणे : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी उद्या प्रस्थान करणार आहे. लाखो वारकरी आळंदी आणि देहूत दाखलही झाले आहेत. तब्बल दोन वर्षांनी आषाढी वारी होणार असल्याने वारकरी, भाविक सर्वांमध्ये उत्साहपूर्वक वातावरण दिसून येत आहे. दोन्ही पालख्यांचे प्रस्थान झाल्यावर एकाच दिवशी संचेती हॉस्पिटलजवळून पुण्यात प्रवेश करतात. त्यावेळी हॉस्पिटलजवळ संभाजी भिडे धारकऱ्यांसहित पालखी सोहळ्यात सहभागी होतात. मात्र यंदा भिडे यांना पोलीस परवानगीशिवाय पालखी सोहळ्यात घुसता येणार नाही. असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट सांगितले आहे.
पुण्यात दोन्ही पालख्या २२ जूनला येणार आहेत. संगमवाडी ब्रिजच्या पार केल्यानंतर पुढील चौकात पालख्यांचे स्वागत केले जाते. तिथून पुढे संचेती हॉस्पिटलजवळून त्या जंगली महाराज रस्त्याकडे मार्गस्थ होतात. त्याठिकाणी संभाजी भिडे आपल्या धारकऱ्यांसहित पालखी सोहळ्यात सहभागी होतात. मात्र यंदा त्यांना पोलिसांच्या परवानगीशिवाय सोहळ्यात सहभागी होता येणार नाही. असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे. संभाजी भिडे यांच्यामुळे मागील पालखी सोहळ्याच्या वेळी काही वादाच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे वादाचे प्रसंग टाळण्यासाठी पोलीस परवानगीशिवाय कोणालाही पालखी सोहळ्यात प्रवेश करता येणार नसल्याचे गुप्ता यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.