पुणे विमानतळावर दुबईहून आलेल्या प्रवाशांकडून जिवंत ४६६ प्रवाळ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 08:13 PM2022-04-09T20:13:13+5:302022-04-09T20:14:18+5:30
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या आणि ग्रीन चॅनलमधून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन प्रवाशांना सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी अडवून त्यांच्या बॅगेची तपासणी ...
पुणे :पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या आणि ग्रीन चॅनलमधून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन प्रवाशांना सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी अडवून त्यांच्या बॅगेची तपासणी केली. तेव्हा बॅगेत ४६६ जिवंत प्रवाळ आढळून आले. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे नमुने जप्त केले आहे. त्यांच्या पूनर्वसनासाठी मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयाकडे सोपविण्यात आले आहेत.
याबाबत सीमा शुल्क अधिकार्यांनी सांगितले की, दुबईहून जेट एअरवेजच्या विमानाने नवी मुंबई (वय ३२) आणि मुंबई (वय २८) येथील दोन तरुण ५ एप्रिल रोजी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. त्यांनी ग्रीन चॅनलमधून जाण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी संशय आल्याने त्यांनी त्यांच्याकडील बॅगांची कसून तपासणी केली. त्यात एका बॅगेमध्ये प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये १०० जिवंत प्रवाळ आढळून आले. दुसऱ्या बॅगेत प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये ३६६ जिवंत प्रवाळ आढळून आले. सीमा शुल्क विभागाने ते जप्त केले आहेत.
त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी व्यावसायिक कारणासाठी ते आणल्याचे मान्य केले. दोघांकडे चौकशी करण्यात येत असून त्याची बाजारपेठेतील किंमतीची माहिती घेत असल्याचे सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त धनंजय कदम यांनी सांगितले.
शोभेसाठी होतो उपयोग
जिवंत प्रवाळांचा उपयोग अनेक श्रीमंतांच्या घरात ॲक्वेरियममध्ये शोभेसाठी केला जातो. या प्रवाळांची किंमत साधारण बाराशे रुपयांपासून १८ हजार रुपयांपर्यंत असते. हे प्रवाह जेवढे आकर्षक तेवढी अधिक त्याची किंमत असते. काही प्रवाळांचा वैद्यकीय कारणांसाठी वापर केला जातो. जिवंत प्रवाळाचा तस्करीचा प्रकार प्रथमच उघडकीस आला आहे.