समृद्ध जीवन फूड्स इंडियाच्या लीना मोतेवार यांना अखेर जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 07:23 PM2018-06-21T19:23:11+5:302018-06-21T19:23:11+5:30
समृद्ध जीवन कंपनीतील गुंतवणुकीतून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक तसेच मुदत संपल्यानंतर पैसे परत न मिळाल्याने याप्रकरणी महाराष्ट्रासह अनेक राज्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल
पुणे : समृद्ध जीवन फूड्स इंडियाच्या संचालिका लीना महेश मोतेवार यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. विशेष न्यायालयाची परवानगी न घेता पुणे सोडून जायचे नाही, दर चार दिवसांनी आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावायची आणि ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एस. एस. जाधव यांनी त्यांचा जामीन मंजूर केला आहे.
समृद्ध जीवन कंपनीतील गुंतवणुकीतून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक तसेच मुदत संपल्यानंतर पैसे परत न मिळाल्याने याप्रकरणी महाराष्ट्रासह अनेक राज्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात सीआयडीने लीना मोतेवार (वय ३७, रा. विद्यादीप सोसायटी, गुलाबनगर, धनकवडी) यांना अटक केली होती. सर्वेसर्वा महेश मोतेवार, राजेंद्र भंडारी या संचालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून ७ नोव्हेंबर २०१६ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
समृद्ध जीवन फूड्स कंपनीच्या लीना मोतेवार या शेअर होल्डर होत्या. २०१३ मध्ये त्यांच्याकडे १ लाख ६२ हजार ५०० शेअर्स होते. कंपनीच्या तीन प्रमुख शेअर होल्डरपैकी त्या एक असल्याने कंपनीचे व्यवहार व निर्णय याबाबत आरोपीची मुख्य भूमिका असल्याची शक्यता आहे. कंपनीच्या वाहनचालकाच्या घरी ठेवलेले १ कोटी रुपयांचे दागिने मोतेवार यांचे आहे. महेश मोतेवार अटकेत असताना लीना यांनी कंपनीशी निगडीत असलेल्या विविध मालमत्ताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तसेच त्यांनी पुण्यातील सराफाकडून एक कोटी ६२ लाख रुपयांचे सोने, चांदी, हि-यांच्या दागिन्यांची खरेदी केली असल्याचे राज्य गुन्हे अन्वेषणने केलेल्या तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणात महेश मोतेवार यांचा मुलगा अभिषेक मोतेवार आणि भाचा प्रसाद किशोर पारसवार देखील न्यायालयीन कोठडीत आहे. बचाव पक्षाकडून अॅड. सत्यम निंबाळकर यांनी कामकाज पाहिले. फसवणूक प्रकरणी दाखल असलेल्या खटल्यात मोतेवार यांची संपत्ती गोठवण्यात आली असून ते जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्य आरोपी तुरुंगात आहे. लिना मोतेवार या केवळ एका वर्षासाठी संचालक होता. मात्र त्यांचा दैनंदिन कामकाजत सहभाग नसल्याचा युक्तीवाद अॅड. निंबाळकर यांनी केली.