सनईचे मंगलमय सूर,आकर्षक रांगोळ्या अन् मोरयाच्या गजरात मानाच्या गणपतींना भावपूर्ण निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 02:04 PM2020-09-01T14:04:47+5:302020-09-01T14:17:44+5:30
''ना ढोल ताशा, ना डीजे, ना बँड फक्त गणपती बाप्पा मोरया ,पुढच्या वर्षी लवकर या'' चा जल्लोषपूर्ण गजर
पुणे : सनई चौघड्यांचे मंगलमय सूर,आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या,गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, यासांरख्या जयघोषांचा गगनभेदी गजरात आणि चैतन्यमय वातावरणात अनंत चतुर्दशीच्या दिवसाला सुरुवात झाली. दहा दिवस मनोभावे लाडक्या गणरायाची सेवा केल्यानंतर आज शहरात सार्वजनिक मंडळांची आणि नागरिकांची लगबग सुरु होती. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुक सोहळ्याचे खास आकर्षण ठरणाऱ्या मानाच्या गणपतींच्या विसर्जन सोहळ्याला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीला हार घातल्यानंतर सुरुवात झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने पण भावपूर्ण वातावरणात मान्यवर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कसबा गणपतीचे सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी मंडपातच विसर्जन करण्यात आले.
पुण्यातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. पुणेकरांसाठीगणेश विसर्जन मिरवणुक सोहळा जिव्हाळ्याचा विषय असतो. दरवर्षी पुण्यात ढोल ताशांच्या मंत्रमुग्ध करणारे वादन, गणपती बाप्पा मोरया गगनभेदी जयघोष, रांगोळ्यांच्या आकर्षक पायघड्या आणि रथांची डोळ्यांची पारणे फेडणारी सजावट यांनी भारलेल्या व भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्याची परंपरा आहे. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणुकांना बंदी आहे. आणि मानाच्या गणपतींसह सर्वच सार्वजनिक गणेश मंडळे श्रींच्या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करत आहे.
मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरीच्या समोर विसर्जनाची तयारी करताना आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती तसेच कोरोनाविषयी जनजागृती पर संदेश देखील देण्यात आला होता. तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी करण्यात आले.
तिसरा मानाचा गणपती म्हणून नावलौकिक असलेल्या गुरुजी तालीम मंडळाने मोजक्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत 'श्रीं'ची आरती करून दुपारी एक वाजता गणरायाचे विसर्जन करत निरोप दिला.
त्यानंतर दुपारी १ वाजून दहा मिनिटांनी मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या तुळशीबाग गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडला.
मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरीवाडा येथील 'श्रीं 'चे विसर्जन दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी करण्यात आले.
दरवर्षी गर्दीने गजबजून जाणाऱ्या पुणे शहरातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्त्यांसह उपनगरातील विविध ठिकाणी कमालीची शांतता अनुभवयाला मिळाली. या ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करू नये यासाठी पुण्यातील महत्वाच्या रस्त्यावंर ठिकठिकाणी पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड्स टाकून रस्ते बंद केले होते. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
मात्र, कोरोनाच्या धर्तीवर तरीदेखील सर्व प्रशासन आणि पोलिसांनी घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करून हा लाडक्या बाप्पांना मोठ्या भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे.