भीमाशंकरच्या रस्त्यासाठी २ कोटी निधी मंजूर, महिनाभरात होणार कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:57 AM2018-02-13T03:57:32+5:302018-02-13T03:57:40+5:30
भीमाशंकर येथील देवस्थान परिसरात पावसाळ्यात वाहनांना मंदिरापर्यंत जाता येत नाही. त्यामुळे मंदिरापासून एक किमी लांबीचा सिमेंटचा रस्ता केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रश्नासनाकडून २ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुढील महिनाभरात निविदा काढून रस्त्याच्या कामास सुरुवात होणार आहे.
पुणे : भीमाशंकर येथील देवस्थान परिसरात पावसाळ्यात वाहनांना मंदिरापर्यंत जाता येत नाही. त्यामुळे मंदिरापासून एक किमी लांबीचा सिमेंटचा रस्ता केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रश्नासनाकडून २ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुढील महिनाभरात निविदा काढून रस्त्याच्या कामास सुरुवात होणार आहे.
पुण्यात आयोजित राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठकीत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भीमाशंकर देवस्थानच्या विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या निधीबाबत चर्चा झाली होती. शासनाकडून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिली होते. तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाधिकारी सौरभ राव तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाच्या अधिकाºयांनी रस्त्याचे काम तातडीने करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याच्या कामासाठी चार दिवसांपूर्वी निधी उपलब्ध करून दिला आहे.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक देवस्थान असल्याने महाराष्ट्रासह देशभरातील भाविक भीमाशंकर येथे दर्शनासाठी येतात. मात्र, अरुंद व खराब रस्त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
त्यातही पावसाळ्यात रस्ता वाहून गेल्याने आणि चिखल साचल्याने वाहनांना मंदिरापर्यंत जाता येत नाही. त्यामुळे या परिसरात सिमेंटचा पक्का रस्ता तयार करावा, अशी मागणी केली जात होती.
दरवर्षी हजारो भाविक भीमाशंकर येथे दर्शनासाठी येतात. पावसाळ्यात रस्ता वाहून गेल्याने मंदिराजवळ वाहनांना जाता येत नाही. काही वेळा वाहने चिखलात रुतून बसतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, आजारी व व्हीआयपी व्यक्तींना मंदिरापर्यंत वाहनांमधून जाता येत नाही. परंतु, मंदिरापासून एक किमी लांबीचा आणि ५.५ रुंदीचा सिमेंटचा रस्ता तयार केला जाणार आहे. तसेच एक छोटा पूल व ५ ते ६ सीसीडी वर्क आदी कामे केली जातील.
- राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग