बृहन् बारामती पाणी योजनेला मंजुरी, ४० कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 02:34 AM2018-04-06T02:34:12+5:302018-04-06T02:34:12+5:30

निधीअभावी रखडलेली बृहन् बारामती पाणीपुरवठा योजना तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यासाठी ४० कोटी रुपयांच्या खर्चाच्या कामाला शासनाने मंजुरी दिली आहे.

 Sanction of Brihan Baramati water scheme, works of 40 crores | बृहन् बारामती पाणी योजनेला मंजुरी, ४० कोटींची कामे

बृहन् बारामती पाणी योजनेला मंजुरी, ४० कोटींची कामे

googlenewsNext

बारामती - निधीअभावी रखडलेली बृहन् बारामती पाणीपुरवठा योजना तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यासाठी ४० कोटी रुपयांच्या खर्चाच्या कामाला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहराच्या बहुतांश भागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
बारामती नगरपालिकेने बृहन् बारामती पाणीपुरवठा योजना आखली होती. सुरुवातीला अंदाजपत्रकानुसार या योजनेचा खर्च १९७ कोटी रुपयांवर जात होता. २००५मध्ये या योजनेला तत्कालीन राज्य शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली होती; मात्र त्यानंतर ही योजना १२९ कोटी रुपयांवर आणण्यात आली. राज्य शासनाच्या महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या योजनेचा एक टप्पा करण्याऐवजी तीन टप्प्यांमध्ये ही योजना राबवावी, अशी सूचना राज्य शासनाने केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यासाठी ४० कोटी रुपयांच्या खर्चाच्या कामाला शासनाने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बारामती नगरपालिकेने या संबंधी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून घेतला आहे.
या योजनेचे काम झाल्यास महादेवमळा, हिंगणेवस्ती, अवचट इस्टेट, पाटस रोड, खंडोबानगर, सिकंदर नगर, मोरगाव रोड, जामदार रोड, नीरा रोड, माळेगाव कॉलनी, फलटण रोड, समर्थनगर, देवळे इस्टेट, हरिकृपानगर, मोतीबाग ओढा रोड, सूर्यनगरी, जळोची, श्रीरामनगर, वडुजकर इस्टेट, दूध संघ सोसायटी, अंबिकानगर, देसाई इस्टेट आदी भागात पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

नवे जलशुद्धीकरण केंद होणार

बारामती शहरातील अस्तित्वातील संगणीकृत जलशुद्धीकरण केंद्राशेजारी व जळोची येथील २२२ दशलक्ष लिटर साठवण तलावाशेजारील जागेत नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, या जलशुद्धीकरण केंद्रासाठी, तसेच ३५५ दशलक्ष लिटर क्षमतेचा साठवण तलाव ते अस्तित्वाखाली सायली हील येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी उचलणे, अहिल्यादेवी गार्डन, ग्रामीण (नीरा रस्ता), स्वीमिंग पूल, भीमनगर, नवज्योत महिला सोसायटी, तांदुळवाडी (कल्याणीनगर), पाटबंधारे वसाहत या भागांसाठी उंच टाक्या उभारणे, नवीन टाक्यांसाठी, तसेच सध्याच्या टाक्यांचा विचार करून शुद्ध पाणी दाबनलिका बसविणे, वितरणनलिका टाकणे, २२२ दशलक्ष लिटर क्षमतेच्या साठवण तलावाच्या दुरुस्तीसाठी जिओ मेम्ब्रेन करणे आदी कामे केली जाणार आहेत.

Web Title:  Sanction of Brihan Baramati water scheme, works of 40 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.