जलपर्णीच्या विळख्याने पवित्र इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:09 AM2021-04-06T04:09:25+5:302021-04-06T04:09:25+5:30
-- स्थानिक व भाविकांमध्ये नाराजी : जलचरांना गमवावा लागतोय जीव, जलपर्णीच्या विळख्याने पवित्र इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात -- आळंदी : ...
--
स्थानिक व भाविकांमध्ये नाराजी : जलचरांना गमवावा लागतोय जीव, जलपर्णीच्या विळख्याने पवित्र इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात
--
आळंदी : तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णीचे साम्राज्य पसरल्याने इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस कमालीची वाढ होत असून, नागरिकांच्या आरोग्यासह जलचरांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.
आळंदीतील स्थानिक नागरिकांसह भाविकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
आळंदी हे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे समाधिस्थळ आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदियाळी अलंकापुरीत माउलींच्या दर्शनासाठी येत असते. पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून श्री माउलींच्या समाधीचे दर्शन घ्यावे, अशी येथे दाखल झालेल्या प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असते. परंतु सध्या भाविकांना इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णीयुक्त व रसायनमिश्रित काळसर पाण्यात स्नान करावे लागत आहे. अनेक भाविकांना इच्छा असूनही पवित्र इंद्रायणीत स्नान न करता फक्त हात जोडून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे इंद्रायणीला निर्मळ वैभव कधी प्राप्त होणार? असा सवाल भाविकांकडून उपस्थित होऊ लागला आहे.
सध्या आळंदीतील पवित्र इंद्रायणीपात्रात दूषित पाण्याचा साठा असून पात्रातील पाण्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. औद्योगिक वसाहतींमधील रसायनमिश्रित घाण पाणी, कचरा इंद्रायणीच्या उदरात मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. तर सांडपाणी बिनधास्तपणे सोडले जात असल्याने जलपर्णीचाही विळखा अधिक गुंफत चालला आहे. परिणामी स्थानिक नागरिक तसेच भाविकांना इंद्रायणीतील पाण्यापासून दूर राहावे लागत आहे. मात्र रसायनमिश्रित पाण्यामुळे नदीतील जलचरांना आपला जीव गमवावा लागत आहे.
--
कोट
: श्रीक्षेत्र देहू आणि आळंदी या दोन्हीही ठिकाणी वर्षभर लाखो वारकरी दर्शनासाठी येत असतात. दर्शनाला जाताना पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करण्याची परंपरा आहे. तसेच वारकरी नदीचं पाणी तीर्थ म्हणून प्राशनही करतात. परंतु इंद्रायणी नदी सध्या प्रचंड प्रदूषित झाली असून त्यात स्नान करणं सोडाच; पण हात-पाय धुणंही अपायकारक बनले आहे.
“ देवदर्शनासाठी परगावाहून आळंदीत आल्यानंतर येथे सर्व सोयीसुविधा मिळाव्यात ही माफक अपेक्षा आमच्यासारख्या भाविकाची असते. नदीतील पाणी दुर्गंधीयुक्त व जलपर्णीमिश्रित असल्याने मनात इच्छा असूनही पवित्र इंद्रायणीत स्नान करता आले नाही.
- गोरख सबनीस, भाविक मुंबई.
--
फोटो ओळ : अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णीचे साम्राज्य पसरले आहे, तर रसायनमिश्रित पाण्यामुळे जलचरांना प्राण गमवावे लागत आहे.