वाळू-गाळाने घोटला जातोय उजनीचा गळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 02:35 PM2019-05-22T14:35:20+5:302019-05-22T14:42:29+5:30
धरण परिसरातील वेगवेगळ्या भागांची पाहणी केल्यानंतर नदीपात्रासह जलाशयात प्रचंड प्रमाणात गाळ साचल्याचे चित्र आहे.
कळस : राज्यात निर्माण होणारी अवर्षणग्रस्त स्थिती आणि पाण्याची वाढती मागणी या कसरतीमध्ये उजनी धरणाचे संवर्धन करण्यासाठी काहीच उपाययोजना होताना दिसत नाही. धरणात मोठ्या प्रमाणात वाळू व गाळ साठल्याने धरणाचा गळा घोटला आहे. धरणाला गाळाचा फास बसत चालला आहे. धरण परिसरातील वेगवेगळ्या भागांची पाहणी केल्यानंतर नदीपात्रासह जलाशयात प्रचंड प्रमाणात गाळ साचल्याचे चित्र आहे.
मेरी या नाशिक येथील संस्थेने २००२ मध्ये केलेल्या अभ्यासात धरणात ९ टीएमसी गाळ साचल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर २०१३ मध्ये नवी दिल्ली येथील तोजो विकास आंतरराष्ट्रीय संस्था व केंद्रीय जल आयोगाच्या वतीने डीजीपीएस या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गाळाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. तेव्हा धरणात जवळपास १५ टीएमसी गाळ असल्याने दिसून आले. या सर्वेक्षणानंतर गेल्या सहा वर्षांत यामध्ये आणखी भर पडली आहे. संस्थेच्या अहवालानुसार, या गाळामध्ये ६० टक्के वाळूचे प्रमाण आहे. या वाळूची तत्कालीन बाजारभावानुसार अंदाजे किंमत ५१ हजार कोटी इतकी आहे. शासनाने हा प्रश्न गंभीरपणे घेत गाळ काढण्याचा निर्णय घेतला तर जवळपास १५ टीएमसी पाणी जास्त साठणार आहे. तसेच शासनाला मोठा महसूल मिळणार आहे.
उजनी धरणातून पाण्याची मागणी प्रत्येक वर्षी वाढत आहे. गाळ काढल्यानंतर वाढणाऱ्या पाण्याचे महत्त्व लक्षात येणार आहे. उजनी धरणात १९८० पासून पाणी साठविण्यास सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत एकदाही धरणातील गाळ काढण्यात आला नाही. सध्या धरणाची पाणीपातळी वजा ५२ पर्यंत गेली आहे. पाणी कमी झाल्याने मोठ्या प्रमाणावर गाळ उघडा पडला आहे. त्यामुळे गाळ काढण्याची ही योग्य वेळ आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
......
* राज्यातील गोड्या पाण्यातील सर्वात जास्त मासेमारी उजनी धरणामध्ये होते. मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने ही मासेमारी संकटात आली आहे. धरणातील माशांची पैदास कमी झाली आहे. त्यामुळे मासे मिळणे मुश्कील झाले आहे, प्रदूषणाचा मुद्दाही गंभीर आहे. त्यामुळे गाळ काढल्यास प्रदूषणालाही काही प्रमाणात आळा घालण्यास मदत होणार आहे. तसेच गाळामुळे बोटी चालविण्यावरही मर्यादा येत आहेत.
..........
* गाळ काढल्यामुळे होणारे फायदे...
गाळ काढल्यास धरणातील पाणी प्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे. तसेच धरण क्षेत्रात येणाºया स्थलांतरित पक्ष्यांचा वावर आणखीच वाढणार आहे. यामुळे पर्यटकांमध्ये वाढ होण्यास मदत होईल. पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण वाढले, परिणामी मासेमारी वाढण्यास मदत होईल. धरणातील गाळ शेतकºयांना आपल्या शेतात टाकण्यासाठी उपयोगी पडेल. यामुळे धरण क्षेत्रात क्षारपड जमीन होण्याचा धोकाही टाळता येईल. गाळ काढल्यामुळे पाणीसाठ्यातही वाढ होणार आहे. त्यामुळे सातत्याने अवर्षण आणि पाणीटंचाईचा सामना करणाºया येथील लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.
.........
उजनी जलाशयाचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना राबवावी. शहरातील सांडपाणी, रासायनिक द्रव्ये, कारखान्यातील सांडपाणी, इतर टाकाऊ वस्तू नदीमध्ये टाकल्याने नदीचे पाणी दूषित होऊन त्याचा परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे नदीचे प्रदूषण रोखणे आणि संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
..........