पिंपळाची वाडी येथे वाळू माफियांना दणका : १३ बोटी फोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 08:09 PM2018-10-02T20:09:09+5:302018-10-02T20:30:48+5:30
पिंपळाचीवाडी (ता. शिरूर) येथे महसूल विभागाच्या पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन करणाºया १३ बोटी जाळून नष्ट केल्या. यात वाळू माफियांचे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले.
शिरूर : पिंपळाचीवाडी (ता. शिरूर) येथे महसूल विभागाच्या पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन करणाºया १३ बोटी जाळून नष्ट केल्या. यात वाळू माफियांचे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
पिंपळाचावाडी येथे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज उत्खनन होत असल्याबाबत महसूल विभागाला माहिती मिळाली. यावर तहसीलदार रणजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडलाधिकारी नीलेश घोडके, तीर्थगिरी गोसावी, तत्पाठी प्रशांत शेटे, दिनेश नरवडे, विजय बेंडभर, प्रमोद लोखंडे, सर्फराज देशमुख, इंगळे, सातपुते, घोडके, धुरंधर, कोतवाल, माऊली कर्डिले, खरात यांच्या पथकाने पिंपळाचीवाडी येथे मंगळवारी अचानक छापा टाकून १३ बोटी जाळून नष्ट केल्या. यात वाळू माफियांचे ५० ते ६० लाख रुपयांच्या सामग्रीचे नुकसान झाले.
तहसीलदार भोसले यांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. मात्र, कारवाईसाठी आवश्यक आधुनिक यंत्रणा महसूल विभागाकडे नाही. स्थानिक नागरिकांचे प्रशासनाला सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे. तहसीलदार भोसले यांच्यावर मध्यंतरी पाळत ठेवून त्यांचा पाठलाग करण्यात आल्याची घटना घडली. यामुळे कारवाई करताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आहे. अशातही आज धडक कारवाई करण्यात आली.