दौंडमध्ये वाळूउपसा सुरूच!
By admin | Published: December 3, 2014 02:56 AM2014-12-03T02:56:00+5:302014-12-03T02:56:00+5:30
दौंड तालुक्यात गेल्या आठवडाभरात महसूल विभागाने बेकायदा वाळूउपशांवर कारवाई केल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले असे बोलले
राहू : दौंड तालुक्यात गेल्या आठवडाभरात महसूल विभागाने बेकायदा वाळूउपशांवर कारवाई केल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले असे बोलले जात होते. मात्र, माफियांनी आम्ही या कारवाईला घाबरत नसल्याचे पुन्हा एकदा
दाखवून दिले आहे. राहूबेट परिसरात मुळा-मुठा व भीमा नदीपात्रात वाळूउपसा पुन्हा जोमाने सुरू आहे.
येथे माफियांनी वाळू काढण्यासाठी आता नवीन फंडा शोधला आहे. महसूल विभागाने गेल्या आठवड्यात केलेल्या कारवाईत बोटी जाळल्या. त्यामुळे माफियांनी आता चाळीस ते पन्नास फळ््याचे ग्राउंड फाउंडेशन बनवून त्याखाली मोकळे लोखंडी बॅलर बांधले आहेत. त्यामुळे हे फाउंडेशन पाण्यावर तरंगते. त्यावरती ५ कामगारांना पाच कोपऱ्यावर उभे करून बादलीला दोर बांधून पाण्यातून शेलकी वाळू वर घेऊन त्या फाउंडेशनवर साठवली जाते. वाळूचा स्टॉक झाल्यानंतर दोराच्या साहाय्याने नदीकाठी आणून ती वाळू ट्रॅक्टरद्वारे बाहेर पाठवली जात आहे.
यदाकदाचित महसूल विभागाचे अधिकारी कारवाईसाठी आले, तर हे कर्मचारी पाण्यामध्ये उड्या टाकून पसार होतात. पारगाव (ता. दौंड) येथे अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाळूउपसा सुरू आहे. राहू (ता. दौंड) परिसरातही छुप्या मार्गाने वाळू तस्कारी सुरू आहे. रात्री-अपरात्री हे तस्कर नदीपात्रात घुसघोरी करून वाळूउपसा करीत आहेत.