संदीप मोहोळ खूनप्रकरणी १५ वर्षांनंतरही न्यायापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:09 AM2021-06-29T04:09:27+5:302021-06-29T04:09:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : संदीप मोहोळ यांचा ४ ऑक्टोबर २००६ रोजी पौड फाटा येथे निर्घृण खून करण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : संदीप मोहोळ यांचा ४ ऑक्टोबर २००६ रोजी पौड फाटा येथे निर्घृण खून करण्यात आला. खुनाच्या खटल्यात पोलिसांनी गणेश मारणे, सचिन पोटे यांच्यासह १८ जणांना अटक केली. त्यांच्यावर दोषारोप लावण्यात आल्यानंतर, १५ वर्षांनंतरही अजूनही या खटल्याचा निकाल प्रलंबित आहे. आरोपी उजळ माथ्याने समाजात वावरत असून राजकीय आश्रयामुळे ते समाजात दहशत निर्माण करीत असल्याचे आम्ही अजून न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे संदीप मोहोळ यांची बहीण साधना शंकर मोहोळ -शेडगे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
संदीप मोहोळ खून खटल्यात आतापर्यंत सर्व साक्षीदारांच्या साक्षी झाल्या असून, तत्कालीन मुख्य सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी युक्तिवाद केला आहे. आरोपींच्या काही वकिलांचा युक्तिवाद झाला असून काही आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद बाकी आहे. मात्र, कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून खटल्यात तारखामागून तारखा पडत असल्याचे साधना मोहोळ -शेडगे यांनी सांगितले.
वेळेवर निकाल न लागल्यामुळे गेली ८ ते १० वर्षे सर्व आरोपी जामिनावर बाहेर राहून दहशत निर्माण करीत आहेत. त्यांना राजकीय आश्रयही मिळत आहे. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांबरोबर या आरोपींचे फोटो सोशल मीडियावर झळकताना दिसतात. यातील मुख्य आरोपी सचिन पोटे याच्याविरुद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाई केली आहे. या खटल्याचे कामकाज न्यायालयाने लवकरात लवकर पूर्ण करून आरोपींना शिक्षा करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी साधना मोहोळ -शेडगे यांनी केली़ या वेळी त्यांचे वडील शंकर मोहोळही उपस्थित होते.