साने गुरूजी म्हणजे महाराष्ट्राची भावमूर्ती : डॉ. रामचंद्र देखणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:08 AM2020-12-27T04:08:21+5:302020-12-27T04:08:21+5:30
पुणे : साने गुरुजींनी प्रेमाचा धर्म सांगितला. ज्ञानेश्वराच्या पसायदानात जी प्रसादिकता आहे तीच ‘खरा तो एकचि धर्म’ या प्रार्थनेत ...
पुणे : साने गुरुजींनी प्रेमाचा धर्म सांगितला. ज्ञानेश्वराच्या पसायदानात जी प्रसादिकता आहे तीच ‘खरा तो एकचि धर्म’ या प्रार्थनेत आहे. म्हणून साने गुरूजी हे महाराष्ट्राचे भावमूर्ती होते. असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी गुरूवारी व्यक्त केले.
अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे साने गुरूजी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या सभागृहात व्याख्यानाचे आयोजन आले होते. ‘जीवनयोगी साने गुरूजी’ या विषयावर डॉ. देखणे बोलत होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे, सहकार्यवाह सुनील महाजन, ज. ग. फगरे, जयवंत मठकर, प्रा. शोयब इनामदार, मुकुंद तेलीचरी, डॉ. दिलीप गरूड, प्रांजली बर्वे, निर्मला सारडा आदी उपस्थित होते.
डॉ. देखणे म्हणाले की, साने गुरूजी यांची लेखणी हृदयाने भरलेली होती. अश्रूंशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य साने गुरूजीच्या साहित्यात होते. त्यांच्या वाड्:मयातून सद्विचाराचे दर्शन घडते. लेखक, कवी, शिक्षक, समाज सुधारक अशा विविध भूमिकांमधून साने गुरूजी यांनी समाजाची सेवा केली. डॉ. संगीता बर्वे यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले.
.....