सांगलीचा ‘सोनहिरा’ कारखाना सर्वोत्कृष्ट : व्हीएसआय; पर्यावरण पुरस्कार जी. डी. बापू लाड कारखान्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:59 PM2017-12-23T12:59:25+5:302017-12-23T13:07:26+5:30
वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्काराने सांगलीच्या सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास गौरविण्यात येईल. कोल्हापूरच्या संभाजी मिसाळ, सुशीला पाटील आणि साताऱ्याच्या अण्णासाहेब शिंदे यांना ऊसभूषण पारितोषिक देण्यात येणार आहे.
पुणे : वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्काराने सांगलीच्या सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास गौरविण्यात येईल. कोल्हापूरच्या संभाजी मिसाळ, सुशीला पाटील आणि साताऱ्याच्या अण्णासाहेब शिंदे यांना ऊसभूषण पारितोषिक देण्यात येणार असल्याची घोषणा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी केली.
व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, राज्य सहकारी साखर कारखाने संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ या वेळी उपस्थित होते. येत्या २६ डिसेंबरला सकाळी साडेदहा वाजता मांजरी येथील व्हीएसआयच्या आवारात हा कार्यक्रम होईल.
सोनहिरा साखर कारखान्याने सरासरी साखर उतारा १२.१६ टक्के इतका दिला असून, क्षमतेच्या १०६.५० टक्के इतका वापर केला आहे. साखरेचा प्रतिक्विंटल उत्पादन खर्चदेखील ५१३ वरून ५०७ रुपयांपर्यंत खाली आणला आहे. या कामगिरीबद्दल त्यांना मानाच्या वसंतदादा पाटील पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. मानपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
यंदाच्या वर्षीपासून आबासाहेब उर्फ किसन महादेव वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरणसंवर्धन पुरस्कार देण्यात येणार आहे. या वर्षीचा पहिला पुरस्कार सांगलीच्या क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यास देण्यात येणार आहे. मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार कोल्हापूरच्या पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कारखाना, ऊस विकास व संवर्धन पुरस्कार कोल्हापूरच्या छत्रपती शाहू कारखान्यास मिळाला आहे़
मध्य विभाग पुरस्कार : गणेश शितोळे-मुळशी, बापू प्रभाकर साबळे-शिरूर, वैयक्तिक पुरस्कार : श्रीशैल हेगण्णा-कोल्हापूर ऊस विकास अधिकारी, आर. बी. पाटील-इंजिनिअर सोलापूर, कृष्णा लोखंडे-केमिस्ट सातारा, अप्पासाहेब कोरे-अकौंटंट सांगली, सुधीर गेंगे-पाटील-आसवनी व्यवस्थापक इंदापूर, एम. डी. मल्लूर-कार्यकारी संचालक कर्नाटक.
तांत्रिक पुरस्कार दक्षिण विभाग : जयवंत शुगर्स - सातारा, राजारामबापू पाटील - सांगली, विश्वासराव नाईक - सांगली, मध्य विभाग : व्यंकटेशकृपा शुगर - शिरूर, सोमेश्वर - बारामती, विघ्नहर - जुन्नर, उत्तरपूर्व विभाग : भाऊराव चव्हाण - नांदेड, कर्मयोगी अंकुशराव टोपे - जालना.