सांगवी आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:14 AM2021-09-05T04:14:55+5:302021-09-05T04:14:55+5:30
सांगवी : बारामती तालुक्यातील सांगवी येथील आरोग्य केंद्राच्या आवारात रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून अनेकांनी हॉटेलसह इतर व्यवसाय थाटले आहेत. ...
सांगवी : बारामती तालुक्यातील सांगवी येथील आरोग्य केंद्राच्या आवारात रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून अनेकांनी हॉटेलसह इतर व्यवसाय थाटले आहेत. यामुळे यांच्याकडे येणारे ग्राहक आरोग्य केंद्राच्या गेट समोरच दुचाकी, चारचाकीसह जडवाहने पार्किंग करत असल्याने येथे खासगी वाहनतळ बनले आहे. त्यामुळे रुग्णवाहिका, आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हे पार्किंग डोकेदुखी ठरत आहे. महत्त्वाचे म्हणजे बाहेरून पाहिले तर इथे आरोग्य केंद्र आहे की नाही हे समजत नसल्याचे चित्र पाहायला मिळत असून यावर उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केलेले व्यावसायिक व भाजीपाला विक्रेते यांना ग्रामपंचायतीने पोलीस ठाण्यामार्फत नोटिसा बजावून देखील अद्याप कोणीही अतिक्रमणे हटविली नाहीत. यामुळे मुख्य चौकात दिवसेंदिवस वाहतूककोंडी होत आहे. तर अनेकदा या वाहतूककोंडीमुळे अपघात देखील झाले आहेत. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मागील भाजपच्या सत्ताधाऱ्यांसह सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. यामुळे गावातील गाव पुढाऱ्यांसह, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना याचे गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे.
हॉटेलवर येणारे ग्राहक आरोग्य केंद्राच्या गेटसमोर वाहने पार्किंग करतात, यामुळे भविष्यात काही अनर्थ घडू नये यासाठी ग्रामपंचायतने या गोष्टीचे गांभीर्य ओळखून याठिकाणी ''नो पार्किंगची'' पाटी लाऊन गेट समोर वाहने लावणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम राबविण्याची गरज वाटू लागली आहे. दरम्यान, आरोग्य केंद्रासह परिसरात नेहमी स्वच्छता असणे आवश्यक आहे. मात्र,गावातील नागरिकांनी आरोग्य केंद्राच्या मोकळ्या जागेत उघड्यावर खासगी मुतारी बनवली आहे. यामुळे आरोग्य केंद्र स्वच्छ राहण्या ऐवजी त्याला अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. तसेच आरोग्य केंद्रात गेल्या नंतर सातत्याने दुर्गंधी येत असते. यामुळे डासांची पैदास होऊन मलेरियासारखे आजार पसरण्याची शक्यता आहे.
०४ सांगवी
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटसमोर वाहनांचे पार्किंग करण्यात आल्याने केंद्र दिसेनासे झाले आहे.