सांगवीत सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:10 AM2021-04-14T04:10:48+5:302021-04-14T04:10:48+5:30
आरोग्य तपासणी करणार सांगवी : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सांगवी (ता. बारामती) येथे नागरिकांसाठी पुन्हा एकदा सर्वेक्षणाच्या माध्यमातून ...
आरोग्य तपासणी करणार
सांगवी : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सांगवी (ता. बारामती) येथे नागरिकांसाठी पुन्हा एकदा सर्वेक्षणाच्या माध्यमातून शुक्रवारी (दि. १६) रोजी ग्रामपंचायत आवारात आरोग्य तपासणी होणार आहे. तर, गावातील सर्व व्यावसायिक दुकानदार यांची अँटिजेन तपासणी करण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे व सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जनार्दन सोरटे यांनी दिली.
डिजिटल थर्मामीटरच्या साह्याने शारीरिक तपासणी पल्स आॅक्सिमीटरच्या सहाय्याने शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण तपासण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना संशय वाटल्यास या मोहिमे अंतर्गत अँटिजेन तपासणी करून घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
जिल्ह्यासह तालुक्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता सगळीकडे हाहाकार माजला आहे. लॉकडाऊनच्या भीतीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह छोटे- मोठे व्यावसायिक वर्ग देखील डबघाईला आला आहे. प्रशासनावर ताण असून देखील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी युध्दपातळीवर न थकता कार्यरत आहे. मात्र, तरी देखील रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. सांगवीत मोठी बाजारपेठ असल्याने पंचक्रोशीतील शेकडोहून अधिक नागरिक विविध खरेदीसाठी येतात. गावातील नागरिकांसह बाहेरील गावातील येणारे लोकदेखील हलगर्जीपणा करून विनामास्क फिरत असल्याने याला अपवाद ठरत आहे. यामुळे सांगवीत रुग्णांचा आकडा आता द्विशतका जवळ आला आहे.
त्या अनुषंगाने आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगवीत आता शुक्रवारी (दि. १६) रोजी सांगवीतील १ हजार ३८२ कुटुंबासह गावातील दुकानदारांची तपासणी होणार आहे. या दरम्यान संशयित आढळणाऱ्या रुग्णांची अँटिजेन तपासणी करण्यात येणार आहे. तर गावातील सर्व दुकानदार यांची सरसकट अँटिजेन तपासणी करण्यात येणार आहे. या अगोदर देखील दोन वेळा ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले होते.
सांगवीत जवळपास शेकडो दुकानदार आहेत. यासाठी जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग सज्ज आहे. गावातील सर्व नागरिकांनी वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पहाता त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तपासणी करून स्वताची व कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्या तावरे यांनी केले आहे.