स्वच्छतागृहांची वानवा, नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:13 AM2018-02-09T01:13:46+5:302018-02-09T01:13:53+5:30
बाणेर बालेवाडीचा भाग स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे; परंतु या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे.
बाणेर : बाणेर बालेवाडीचा भाग स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे; परंतु या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात मोबाईल टॉयलेटचा प्रयोग करण्यात आला. परंतु, अनेकदा हे टॉयलेट बंद असल्याने नागरिकांना त्यांचा वापर करता येत नाही.
बाणेर-बालेवाडी परिसर १९९९मध्ये पुणे महापालिकेत समाविष्ट झाला आहे. झपाट्याने विकसित झालेला व उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेला परिसर म्हणून या परिसराची ओळख आहे. परंतु, या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा असल्याने नागरिकांना इतरत्र जावे लागत आहे. लाखो नागरिक बाणेर परिसरात रोज ये-जा करतात. अनेक महिला, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे त्वरित परिसरात स्वच्छतागृहे उभारावीत, अशी मागणी होत आहे.
नगरसेविक ज्योती कळमकर म्हणल्या, ‘‘प्रभाग क्रमांक ९ बाणेर-बालेवाडीमध्ये सन २०१८-१९च्या बजेटमध्ये तरतूद करून वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्याचा संकल्प केला आहे. यासाठी सह्याद्रीमध्ये स्वच्छतागृह उभारणे व दुरुस्तीसाठी बजेट दिले आहे. मुख्य रस्त्याच्या पादचारी मार्ग व अॅमिनिटी स्पेसमधील भागात स्वच्छतागृहांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.’’
नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले, ‘‘बाणेर बालेवाडी परिसरातील दहाहून अधिक जागा स्वच्छतागृहासाठी स्मार्ट सिटी कंपनी व पालिकेला सुचविल्या आहेत. बालेवाडी येथे हायस्ट्रीट, मोझे कॉलेज रस्ता परिसरात जागा देण्यात येणार आहे. सध्या मोबाईल टॉयलेटची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.’’
नगसेविका स्वप्नाली सायकर म्हणाल्या, ‘‘महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने अनेक समस्या निर्माण होत असल्याची बाब खरी आहे. यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली होती. परंतु, प्रशासकीय पातळीवर जागा उपलब्ध न झाल्याने स्वच्छतागृह बांधता आले नाही. विशेषकरून महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध होण्यासाठी आपण आग्रही असून त्याबाबात काही जागादेखील प्रशासनाला सुचवल्या आहेत.’’
सहायक आयुक्त संदीप कदम म्हणाले, ‘‘अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर स्थानिक जागा मालक अथवा दुकानदारांचा स्वच्छतागृहाला विरोध होतो; परंतु स्मार्ट सिटीअंतर्गत बाणेर-बालेवाडी परिसरात २० ठिकाणी जागा सुचविण्यात आल्या आहेत. या ठिकाणी येत्या वर्षात स्वच्छतागृहांची निर्मिती होईल.’’
>विकसित परिसरातही जागा नाही
बाणेर रस्ता, बालेवाडी रस्ता, धनकुडेवस्ती रस्ता, हाय स्ट्रीट, औंध- बाणेर, पिंपळे निलखकडे जाणारा रस्ता, पाषाण लिंक रस्ता परिसरात एकही स्वच्छतागृह नाही. नव्याने विकसित झालेल्या परिसरातही स्वच्छतागृहासाठी जागा उपलब्ध नाही.
यामुळे नागरिकांनी नैसर्गिक विधीसाठी जायचं कुठं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत विविध सामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ यांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली आहे. परंतु दर वेळी जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत या प्रश्नाला बगल दिली जाते.
बाणेर-बालेवाडी परिसरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या अॅमिनिटी स्पेसच्या जागेत स्वच्छतागृह उभारण्यात याव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत.