पुणे जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी संजय जगताप
By admin | Published: April 13, 2016 03:24 AM2016-04-13T03:24:58+5:302016-04-13T03:24:58+5:30
पुणे जिल्हा (ग्रामीण) काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुरंदरमधील काँग्रेस नेते संजय जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी व खासदार
सासवड : पुणे जिल्हा (ग्रामीण) काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुरंदरमधील काँग्रेस नेते संजय जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी व खासदार जनार्दन द्विवेदी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संमतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची यादी नुकतीच जाहीर केली. त्यात ही निवड जाहीर करण्यात आली.
जगताप हे राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी आमदार आहेत. संत सोपानकाका सहकारी बँकेचे अध्यक्ष, तर सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.
सन २०११मध्ये झालेल्या सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीत संजय जगताप यांनी नेतृत्वाखाली काँग्रेस पुरस्कृत जनमत विकास आघाडीला एकहाती सत्ता मिळवून दिली.
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर ते काँग्रेसचे सभापती असून, सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत जगताप यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या भोंगळ कारभाराबाबत केलेले आंदोलन, शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी केलेला रास्ता रोको आदी विविध आंदोलनांचे त्यांनी नेतृत्व केले आहे. पुरंदर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या युवकांनी या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.