येत्या निवडणूकीत भाजपाच्या प्रचारात काकडेंचा 'क्रिम' राेल असेल : गिरीश बापट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 02:56 PM2019-03-23T14:56:54+5:302019-03-23T15:01:55+5:30
निवडणूकीच्या प्रचारात संजय काकडेंचा 'क्रिम' राेल असेल अशी टिप्पणी गिरीश बापट यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर केली आहे.
पुणे : भाजपाचे सहयाेगी खासदार संजय काकडे यांनी आपण काॅंग्रेसमध्ये जाणार असल्याचे जाहीर केलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्ती करण्यात यश आले. त्यामुळे काकडे हे भाजपामध्ये राहणार असून त्यांना पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे देखील असल्याने काकडे यांची येत्या निवडणूकीच्या प्रचारात काय राेल असेल असा प्रश्न केला असता काकडेंचा प्रचारात 'क्रिम' राेल असेल अशी टिप्पणी गिरीश बापट यांनी केली.
काल रात्री उशीरा पुण्याच्या लाेकसभेच्या जागेवर गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे आज वाजत गाजत भाजप पक्ष कार्यालयात स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते पत्रकारांशी बाेलत हाेते. बापट म्हणाले, येत्या निवडणूकीत प्रत्येकावर पक्षाने जबाबदारी निश्चित केली आहे. काकडे यांच्यावर देखील चांगली जबाबदारी दिली असून त्यांचा निवडणूकीत क्रिम राेल असेल. काेणाला काय जबाबदारी द्यायची हे पक्षसंघटन ठरवत असतं. त्याप्रमाणे कामाचे वाटप केले जाते. निवडून येण्याच्या दृष्टिकाेनातून हे उपयाेगी पडत असते. जाे सक्षम असेल त्याला ती जबाबदारी दिली जाते. आम्ही हातात हात घालून काम करणार आहाेत, पायात पाय अडकवणार नाही.
तसेच ज्यांना उमेदवारी जाहीर झाली नाही त्या सर्वांची भेट घेणार असून इतर पक्षांच्या उमेदवारांची देखील भेट घेणार असल्याचे बापट यावेळी म्हणाले.
दरम्यान काकडे हे पुण्यातून लाेकसभेची जागा भाजपाकडून लढविण्यासाठी उत्सुक हाेते. भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्यास ते पक्षांतर देखील करणार हाेते. परंतु मुख्यमंत्र्यांनी काकडेंशी चर्चा करुन त्यांची मनधरनी केली. त्यानंतर त्यांच्यावर निवडणूकीत पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.