संजय काकडे यांचे पंकजा मुंडेंबद्दलचे वक्तव्य वैयक्तिक ; भाजपने हात झटकले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 05:36 PM2019-12-13T17:36:59+5:302019-12-13T17:38:20+5:30
आधीच भाजप आणि मुंडे यांच्यात धुसफूस सुरु असताना काकडे यांचे वक्तव्य चर्चेत होते. शेवटी शहराध्यक्षांनी पुढे येऊन काकडे यांच्या वक्तव्याला निषेध करण्याइतकेही महत्व देऊ नये असे सांगितले.
पुणे : राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून भाजपमध्ये चांगलाच गदारोळ उडाला आहे. अखेर शहराध्यक्षा माधुरी मिसळ यांनी पत्रकार परिषद घेऊन ते काकडे यांचे वैयक्तिक मत असून पक्षाशी त्याचा काहीही संबंध संबंध नसल्याचे स्पष्ट केले. आधीच भाजप आणि मुंडे यांच्यात धुसफूस सुरु असताना काकडे यांचे वक्तव्य चर्चेत होते. शेवटी शहराध्यक्षांनी पुढे येऊन काकडे यांच्या वक्तव्याला निषेध करण्याइतकेही महत्व देऊ नये असे सांगितले.
मुंडे यांनी काल गोपीनाथ गडावर सभा घेऊन आपली भूमिका मांडली. त्यावर अजून तरी पक्षातल्या कोणत्याही प्रमुखाने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.काकडे यांनी 'मुंडे या स्वतःच त्यांच्या पराभवाला करणीभूत असून त्यांनी इतरांवर खापर फोडू नये, पाच वर्ष तुम्ही सत्तेत होता, तेव्हा तुम्हाला काही काम करता आली नाही तर महाराष्ट्रात काय तुम्ही फिरणार' अशा शब्दात टीका केली होती.
त्या टीकेने आता पंकजा मुंडे समर्थक नाराज झाले असून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. याच मुद्द्यावर बोलताना मिसाळ म्हणाल्या की,' गेल्या २-३ दिवसांमध्ये बऱ्याच शक्ती दिसताहेत की ज्यांना भाजपमध्ये फूट पाडायची आहे. त्यांचा पक्षामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. निषेध करण्याइतकं या वक्तव्याला महत्त्व देऊ नये असं मला वाटतं. भाजपच्या कोणत्याही नेत्याचे हे म्हणणे नाही. पंकजा या आमच्या गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरचे नेतृत्व आहे. गेली पाच वर्ष त्या पक्षासाठी काम करत आहे, त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करते '.