टीआरपीचा विषय म्हणणाऱ्या संजय राठोड यांना सत्तेचा माज : वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:15 AM2021-08-14T04:15:07+5:302021-08-14T04:15:07+5:30
पुणे : लैंगिक शोषाणाचा आरोप करणाऱ्या महिलेच्या तक्रारीस, माजी मंत्री संजय राठोड यांनी टीआरपी न्यूजसाठी आरोप केले जात असल्याचे ...
पुणे : लैंगिक शोषाणाचा आरोप करणाऱ्या महिलेच्या तक्रारीस, माजी मंत्री संजय राठोड यांनी टीआरपी न्यूजसाठी आरोप केले जात असल्याचे सांगून, सत्तेचा माजच दाखविला आहे. मात्र या प्रकरणात सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत प्रदेश भाजप सर्वस्तरावर लढा देणार असल्याचे प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले.
याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना वाघ यांनी, यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षकांशी माझे बोलणे झाले असल्याचे सांगून संबंधित पिडीत महिलेचे राठोड यांच्याविरोधात तक्रारपत्र आल्याचे सांगितले आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देषानुसार २४ तासाच्या आत यावर कार्यवाही होणे अपेक्षित असताना, या पत्राची अद्यापही दखल घेतली गेलेली नाही.
आज महिलांवरील अत्याचाराची महाराष्ट्रात दखल घेतली जात नाही. सर्व सामान्य महिलांसह आता पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्यांनाही लैगिंक अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण प्रकरणातील फॉरेसिक रिपोर्ट पुढे का आणला नाही, त्यात काय झालं, साधी एफआयआरही अद्याप का दाखल झाली नाही असे प्रश्न करीत, गृहमंत्र्यांनी याबाबतीत लक्ष घालून लागलीच कारवाई केली पाहिजे, अशी मागणी वाघ यांनी केली़
दरम्यान गृह खाते म्हणजे आंधळ दळतय अन् कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था आज झाली असल्याची टीका करून, राज्यातील सत्ताधारी तीन पक्ष केवळ एकमेकांची पाठ थोपण्यात मग्न असल्याचा आरोपही वाघ यांनी केला. परंतु, राज्य सरकार जरी मुर्दांड असले तरी आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याने, पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी उच्च न्यायालयात पीआयएल दाखल केली असल्याचे वाघ म्हणाल्या.
-----------------
संजय राठोड विरोधातच असे आरोप का ?
माजी मंत्री व शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्यावरच महिलांच्या लैगिंक अत्याचाराचे आरोप का होतात. असे असतानाही राठोड यांच्यावर राज्य सरकारकडून कारवाई केली जात नाही़, यामुळे आगामी रक्षाबंधनाच्या दिवशी महाराष्ट्रातील माता भगिनींच्यावतीने मुख्यमंत्र्यांना राखी पाठवून आमची सुरक्षा करा म्हणून विनंती करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.