Sanjay Raut : पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही; पण आम्ही समोरुन कोथळा बाहेर काढतो...!"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 06:54 PM2021-09-04T18:54:00+5:302021-09-04T18:56:15+5:30
संजय राऊतांचं पाटलांना प्रत्युत्तर
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका करताना पाठीत खंजीर खुपसणारा चेहरा असे वक्तव्य केले होतं. याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटलेले होते. मात्र, पाटलांच्या याच टीकेवर भाष्य करताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही. आम्ही समोरुन कोथळा बाहेर काढतो, पाठीमागून नाही. शब्द तुम्ही फिरवला आम्ही नाही अशा शब्दात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत शनिवारी ( दि. ४) पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राऊत यांचं खेड-शिरुरमध्ये शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केलं. राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना मी चंपा म्हणणं बरोबर नाही. ते म्हणाले आमचे १०५ आमदार आहेत, तरी आमचा मुख्यमंत्री नाही. त्यांना वाटलं ते येतील, पण आले नाहीत. पण आम्ही समोरुन कोथळा काढतो, पाठीमागून नाही. पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही. शब्द तुम्ही फिरवला आम्ही नाही अस पलटवार केला आहे.
राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असलं तरी मुख्यमंत्री ज्यांचा मुख्यमंत्री असतो त्यांच सरकार असतं. सरकार आपलं आहे. शिवसेना दोन्ही पक्षांच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वर आहे. ही आपली पॉवर आहे. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांना आव्हान देतानाच शिवसैनिकांनो, आजपासूनच कामाला लागा. कारण शिरुर आणि जुन्नर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकणार आहे असा आत्मविश्वास देखील राऊत यांनी व्यक्त केला आहे.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते....
आतापर्यंत पाठीत खंजीर खुपसला असं म्हटलं तर एकच चेहरा समोर याचचा, तो कोणाचा? असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारतानाच त्यावर उपस्थितांनी शरद पवार असे उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी आता पाठीत खंजीर खुपसला असे म्हटले की दुसरा चेहरा ही समोर येतो, तो कोणाचा? असा प्रश्न विचारताच त्यावर उपस्थितांपैकी काहींनी उद्धव ठाकरेंचा नाव घेतले होते. त्याला चंद्रकांत पाटील यांनी दुजोरा दिला होता.