Sanjay Raut Meets Vasant More: संजय राऊत आणि वसंत मोरे यांची भेट; राऊत म्हणाले...'तात्या चांगलं चाललंय!'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 03:01 PM2022-06-01T15:01:19+5:302022-06-01T15:02:16+5:30
शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार संजय राऊत सध्या पुण्यात आहेत. राऊतांनी पुण्यातून महापालिकेवर भगवा फडकवणार असल्याचा एल्गार केला आहे.
पुणे-
शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार संजय राऊत सध्या पुण्यात आहेत. राऊतांनी पुण्यातून महापालिकेवर भगवा फडकवणार असल्याचा एल्गार केला आहे. तसंच पत्रकार परिषदेत भाजपावर जोरदार निशाणा साधला. पण यासगळ्यात संजय राऊत आणि मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या भेटीचा चर्चा सर्वाधिक चर्चा होऊ लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या प्रश्नावरुन पुकारलेल्या आंदोलनाविरोधात सूर आळवल्यानंतर वसंत मोरे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करत पुणे शहर अध्यक्ष पदावरुन त्यांना हटविण्यात आलं होतं. त्यानंतर वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाली. पण आपण कट्टर मनसैनिक असून राज ठाकरेंच्या विचारांशी बांधील असल्याचं सांगत मोरे मनसेतच आहेत. दुसरीकडे वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मनसेच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांबाबत सातत्यानं नाराजी आणि खदखद व्यक्त करत आहेत. पक्षात डावललं जात असल्याचा आरोपही मोरे यांनी केला आहे.
वसंत मोरे यांच्याकडे पक्षाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचं चित्र उभं राहिलं आहे. तसंच स्वत: वसंत मोरेंनी देखील पुणे शहर कार्यालयापासून दूर राहण्याची भूमिका घेतली आहे. अशातच आज संजय राऊत पुण्यात असताना वसंत मोरे आणि राऊतांच्या अनौपचारीक भेटीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पुण्यात एका लग्नसमारंभात संजय राऊत यांनी उपस्थिती लावली. याच सोहळ्यात वसंत मोरे देखील उपस्थित होते. दोघंही एकमेकांसमोर येताच संजय राऊत यांनी वसंत मोरे यांना तात्या नावानं ओळखलं. तसंच संजय राऊत यांनी वसंत मोरे यांची गळाभेट घेतली आणि ते करत असलेल्या कामाचं कौतुक देखील केलं. ठाण्यातील तुमचं भाषण ऐकल्याचंही संजय राऊत यांनी यावेळी वसंत मोरे यांना सांगितल्याची माहिती मिळाली आहे.
शिवसेनेत येण्याची ऑफर?
संजय राऊत यांनी वसंत मोरेंची गळाभेट तर घेतलीच त्यासोबत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. "तात्या तुम्ही चांगलं काम करत आहात", असं संजय राऊतांनी वसंत मोरेंना म्हटलं. इतकंच नव्हे, तर जाता जाता संजय राऊत यांनी 'भेटू' असं म्हणत सूचक विधान केलं. त्यामुळे राऊतांनी वसंत मोरेंना शिवसेनेत येण्याची ऑफर तर दिली नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.