Sanjay Raut: "मराठी माणसांच्याही मर्सिडीज असायला पाहिजेत, पण कष्टाच्या; चोरीच्या नको"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 12:36 PM2022-05-06T12:36:01+5:302022-05-06T12:37:45+5:30
पुण्यात बोलताना, हडपसरच्या या गल्लीत असे म्हणत संजय राऊत यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
पुणे/मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे हे चांगले व्यंगचित्रकार होते. मात्र, भाजपाने त्यांच्या व्यंगचित्राचा गळा घोटला. अनेक व्यंगचित्रकारांना हल्ली लाईनही वाचता येत नाही, तर काही व्यंगचित्रकार आपली लाईन बदलतात, असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. ते पुण्यात बोलत होते. येथील भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी मर्सडीज कारच्या मुद्द्यावरुन अप्रत्यक्षपणे फडणवीस यांनाही लक्ष्य केलं. कारण, फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना मर्सडीज बेबी असं म्हटलं होतं.
पुण्यात बोलताना, हडपसरच्या या गल्लीत असे म्हणत संजय राऊत यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. नाशिक, ठाणे, पुणे येथील अशा गल्लीतूनच शिवसेना दिल्लीपर्यंत पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. या गल्लीत कोणी मर्सिडीज चोर नसावेत. आमच्याही मर्सिडीज आहेत. मराठी माणसांच्या मर्सिडीज असायला पाहिजेत. पण, त्या कष्टाच्या चोरीच्या नकोत, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता टोला लगावला.
काय आहे मर्सिडीजचा वाद
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि युवासेना नेते तसेच राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगताना पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशिद पतनावेळी शिवसैनिक नव्हता, असा दावा केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस १८५७ च्या लढ्यातही सहभागी असतील, असा प्रतिटोला आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंचा मर्सिडीज बेबी असा उल्लेख करून निशाणा साधला होता. संजय राऊतांनी हडपसर येथील सभेत मराठी माणसांच्या मर्सिडीज असायला पाहिजेत, असे म्हणत फडणवीसांना टोला लगावला.
आदित्य ठाकरेंवर पलटवार
तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मर्सिडीज बेबींनी ना संघर्ष केला आहे, ना संघर्ष पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते उडवू शकतात. आमच्यासारखे लाखो कारसेवक जे बाबरी पाडली गेली तेव्हा तिथे उपस्थित होते त्यांना आजही गर्व आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. तसेच मी हिंदू आहे आणि त्यामुळे माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. त्यामुळे मागील जन्मामध्ये मी असेल तर १८५७ च्या युद्धामध्ये तात्या टोपे आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या बाजूने लढत असेल आणि तुम्ही असाल तर त्याही वेळी तुम्ही इंग्रजांसोबत युती केली असेल.
भाऊ मुख्यमंत्री झाल्याने पोटदुखी
शिर्डी, पंढरपूर याठिकाणी लोकांना आज काकड आरती घेता नाही आली. हजारो भाविक याला मुकले. यांच्यामुळे हिंदूंचा गळा आवळला गेला, असं विधान संजय राऊत यांनी केले. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण केल्याशिवय दिवस उजाडत नाही. त्यांनी महाराष्ट्र घडवला, शिवसेना उभी केली, स्वाभिमान दिला. बाळासाहेबांच्या जवळून 30 वर्ष काम करणारा मी आहे, असं संजय राऊत म्हणाले. गेली १५ वर्षे ज्यांना भोंग्याचा त्रास झाला नाही, त्यांना आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्रास सुरू झाला, हा पोटदुखीतून सुरू झालेला त्रास आहे, अशी टीका देखील संजय राऊतांनी राज ठाकरेंवर केली आहे.