अवयवदानामुळे दोन रुग्णांना संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:23 AM2017-08-02T03:23:06+5:302017-08-02T03:23:06+5:30
४३ वर्षीय महिलेचा बारामती-जेजुरी रस्त्यावर रविवारी अपघात झाला. उपचारासाठी महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पुणे : ४३ वर्षीय महिलेचा बारामती-जेजुरी रस्त्यावर रविवारी अपघात झाला. उपचारासाठी महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्री महिलेला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. समुपदेशनानंतर नातेवाईकांनी अवयवदानास सहमती दर्शवली. महिलेचे यकृत, हृदय, डोळे आणि त्वचादान करण्यात आल्याने दोन रुग्णांना जीवदान मिळाले.
याबाबत माहिती देताना रुबी हॉल क्लिनिकच्या प्रत्यारोपण समन्वयक डॉ. सुरेखा जोशी म्हणाल्या, ‘रुबी हॉलमधील ५२ वर्षीय महिलेमध्ये यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले. नॅशनल आॅर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट आॅर्गनायझेशन बॉडी (नोट्टो) च्या माध्यमातून हृदय दिल्लीतील एम्स रुग्णालयातकडे पाठवण्यात आले. तेथील ४४ वर्षीय महिलेमध्ये हृदय प्रत्यारोपित करण्यात आले.’ दुपारी १.१० मिनिटांनी रुबी हॉलमधून ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून हृदय पाच मिनिटांत पुणे विमानतळावर पोहोचले. रुबी हॉलमधील डॉक्टरांची टीम हृदय घेऊन ३ वाजून २० मिनिटांनी दिल्लीला पोहोचली. दिल्लीतील एम्स रुग्णालयातील ४४ वर्षीय महिलेमध्ये हृदय यशस्वीरित्या प्रत्यारोपित करण्यात आले, अशी माहिती झेडटीसीसीच्या पुणे समन्वयक आरती गोखले यांनी दिली.
त्वचा एक वर्षापर्यंत जतन करून ठेवण्यात आली असून, पुढील ७२ तासांमध्ये डोळ्यांचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. महिलेच्या शरीरातून हृदय काढण्याची शस्त्रक्रिया डॉ. डिकास साहू आणि डॉ. मनोज सुरेराज यांनी यशस्वीपणे पार पाडली. यकृत प्रत्यारोपणासाठी डॉ. कमलेश बोकील आणि डॉ. मनीष वर्मा यांनी काम पाहिले. पुण्यातून बाहेर अवयव पाठवण्यात आल्याची ही तिसरी वेळ आहे. डिसेंबर महिन्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून चेन्नईला हृदय पाठवण्यात आले तर, फेब्रुवारीमध्ये रुबी हॉलमधून दिल्लीला हृदय पाठवण्यात आले होते. रुबी हॉल क्लिनिकमधून ७ वेळा हृदय पाठवण्यात आले आहे.