आळंदीत ‘माउली - माउली’ च्या जयघोषात ‘श्रीं’ ची वैभवी रथोत्सव मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 06:43 PM2023-12-10T18:43:26+5:302023-12-10T18:43:49+5:30

संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम सोमवारी पहाटे तीनपासून सुरू होणार

sanjivan samadhi sohala program in alandi | आळंदीत ‘माउली - माउली’ च्या जयघोषात ‘श्रीं’ ची वैभवी रथोत्सव मिरवणूक

आळंदीत ‘माउली - माउली’ च्या जयघोषात ‘श्रीं’ ची वैभवी रथोत्सव मिरवणूक

आळंदी : उभारिला ध्वज तीही लोकांवरती !
             ऐसा चराचरी कीर्ती ज्यांची !!
             ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान !
             मुक्ताबाई ज्ञानदीप्तीकळा !!
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळा दिनानिमित्त रविवारी (दि. १०) ‘माउली - माउली’च्या जयघोषात ‘श्रीं’ची वैभवी ‘रथोत्सव’ मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखों भाविकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेण्यासाठी नगरप्रदक्षिणा मार्गावर गर्दी केली होती. सोमवारी (दि. ११) माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे.

तत्पूर्वी, पहाटे माउलींना पवमान अभिषेक व दुधारती घालून अडीचच्या सुमारास प्रांताधिकारी कट्यारे यांच्या हस्ते शासकीय पंचोपचार पूजा पार पडली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास परंपरेनुसार इनामदार कुटुंबीयांच्या वतीने माउलींची विधिवत पूजा करून माउलींचा चांदीचा मुखवटा नगरप्रदक्षिणेसाठी सजविलेल्या रथात विराजमान करण्यात आला. विविध रंगीबेरंगी आकर्षक वस्त्रालंकारांनी सजविलेले ‘श्रीं’चे रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. टाळ- मृदंगांचा निनाद आणि ‘माउली-तुकोबां’च्या' जयघोषात रथोत्सव मिरवणूक फुलवाले धर्मशाळा, चाकण चौक, भैराेबा चौकमार्गे हजेरी मारुतीपासून मुख्य मंदिराकडे मार्गस्थ झाली.

धुपारतीनंतर मंदिरातील गाभाऱ्यात फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुख, सेवेकरी यांचा देवस्थानच्या वतीने नारळप्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. महानैवेद्य, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भजन, जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी द्वादशीचा दिवस साजरा करण्यात आला. दरम्यान, दुपारी चार वाजता वीणा मंडपात ह.भ.प. हरिभाऊ महाराज बडवे यांचे हरिकीर्तन झाले. तर संजीवन समाधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला केंदूर (ता. शिरूर) येथील संतश्रेष्ठ श्री कान्होराज महाराजांनी मंदिरात कीर्तन केले होते. त्यांची प्रथा व परंपरा आजही केंदुरकरांकडून जपली जात आहे. रात्री नऊ ते अकरा यावेळेत वीणा मंडपात केंदुरकरांच्या वतीने कीर्तन झाले. रात्री उशिरा नारळ - प्रसाद वाटून द्वादशीची सांगता करण्यात आली.

संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम सोमवारी (दि. ११) पहाटे तीनपासून सुरू होणार आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वैद्य त्रयोदशीला अलंकापुरीत समाधी घेतली होती. मंगळवारी त्याला ७२७ वर्षे पूर्ण होतील. त्यानिमित्त ‘श्रीं’च्या संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी, माउलींच्या मंदिरात घंटानाद, सोहळ्यावर आधारित वीणा मंडपात संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराजांचे कीर्तन होईल.

* रात्री १२ पासून संजीवन समाधीच्या दिवसाला प्रारंभ.
* पहाटे ३ ते ४ विश्वस्तांच्या हस्ते पवमान अभिषेक व दुधारती.
* सकाळी ७ ते ९ हैबतबाबा पायरीपुढे कीर्तन.
* ७.३० ते ९.३० वीणामंडपात कीर्तन.
* सकाळी १० ते दुपारी १२ संजीवन समाधी सोहळ्यावर ह.भ.प. नामदास महाराजांचे कीर्तन.
* सकाळी १० ते दुपारी १२ महाद्वारात काल्याचे कीर्तन नंतर हैबतबाबा दिंडीची समाधी मंदिरात प्रदक्षिणा.
* दुपारी १२ ते साडेबारा ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त घंटानाद, पुष्पवृष्टी व आरती, नारळ व प्रसाद.
* दुपारी १२:३० ते १ महानैवद्य.
* सायंकाळी ६:३० ते ८:३० वीणा मंडपात सोपानकाका देहूकर यांचे कीर्तन.
* रात्री ९.३० ते ११:३० कारंजा मंडपात भजन.
* रात्री १२ ते ४ हैबतरावबाबा आरफळकर यांच्या वतीने जागर.

Web Title: sanjivan samadhi sohala program in alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.