‘ती’च्या सुरक्षेची व्हावी संकल्पसिद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:17 AM2021-09-10T04:17:07+5:302021-09-10T04:17:07+5:30
पुण्यातूनच ‘ती’चा गणपती ही चळवळ सुरू करण्यामागे ‘लोकमत’ची भूमिका आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाची चळवळ ...
पुण्यातूनच ‘ती’चा गणपती ही चळवळ सुरू करण्यामागे ‘लोकमत’ची भूमिका आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाची चळवळ पुण्यातच सुरू केली. सावित्रीबाईंच्या निर्धारानाचे शिक्षणाच्या प्रकाशाचे अग्निपंख महिलांना लाभले. त्यातून या तेजस्विनी आणखी उजाळून निघाल्या. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यातच केली. अर्धे जग असलेल्या महिलांच्या हाती आरतीचे ताट देण्याची सुरुवातही ‘ती’चा गणपतीने पुण्यात सुरू केली. पौरोहित्यापासून ते आरतीपर्यंत सर्व विधी महिलांच्या हस्ते करतानाच महिलांच्या विचाराला व्यासपीठ देणारी ‘ती’चा गणपती ही एक चळवळ म्हणून पुढे येत आहे. ‘ती’चा गणपती हे केवळ वैचारिक अधिष्ठान राहू नये यासाठी कृतिशील पाऊलही उचलले. गेल्या सहा वर्षांपासून गणेशोत्सव काळात महिला सुरक्षेचा जागर करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने मिडनाईट बाईक रॅली काढण्यात येत आहे. भर मध्यरात्री दुचाकीवरून या रॅलीमध्ये सहभागी होत आत्तापर्यंत हजारो महिलांनी सुरक्षेचा जागर केला आहे. मात्र, समाजात विकृत नजरा आहेत तोपर्यंत महिला सुरक्षेच्या चळवळीला पूर्णविराम देताच येत नाही. पुण्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे ही चळवळ आणखी गतिमान करण्याची गरज प्रतित झाली आहे. संकल्पसिद्धी ही या वर्षीची ‘ती’चा गणपतीची संकल्पना आहे. समाजातील सर्व स्तरांवर जागर होत महिला सुरक्षेची संकल्पसिद्धी व्हावी हीच शक्ती ‘ती’चा गणपतीकडून मिळावी.