कोरोनामुळे गावच्या जत्रांवर आली संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:11 AM2021-02-09T04:11:52+5:302021-02-09T04:11:52+5:30
भोर: गेली वर्षभर सर्वजण कोरोनाच्या सावटाखाली जगत आहोत. सध्या याचे प्रमाण कमी झाले असले तरी भीती कायम आहे. कोरोनामुळे ...
भोर: गेली वर्षभर सर्वजण कोरोनाच्या सावटाखाली जगत आहोत. सध्या याचे प्रमाण कमी झाले असले तरी भीती कायम आहे. कोरोनामुळे कार्यक्रम असो वा अन्य काही त्यावर निर्बंध आले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला तो मजुरी करणाऱ्या तसेच गावच्या जत्रांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना. सध्या यात्रांचा हंगाम असला तरी कोरोनामुळे यात्रा बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे व्यवसाय बंद असून या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
जत्रा म्हटले की वर्षभरातील कामातून वेळ काढून देवदेवतांचे दर्शन आणि निखळ मनोरंजन एक हौस वेगळीच असते. यादरम्यान, नोकरी कामधंद्यासाठी गाव सोडून इतरत्र गेलेले ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहकुटुंब गावाला येत असतात. त्याचप्रमाणे सासुरवासीन मुली-महिला आपल्या माहेराला आप-आपले पाहुणे मोठ्या उत्साहाने जत्रेस येत असतात.
दोन दिवसांच्या या जत्रेत देवदेवतांची पूजा, पुरणपोळीचा नैवेद्य, ढोल लेझीम झबिना, आरती, कुस्त्या व ऑर्केस्ट्रा, तमाशा असे मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडत असतात. तर जेवणावळीचा आनंद वेगळाच असतो. मंदिराच्या आवारात मिठाई आइस्क्रीम, कुल्फी, बांगड्या, खेळणी, शोच्या वस्तूंची दुकाने, पाळणे यांमुळे महिला व मुलांनी मंदिर परिसर गजबजून जात असे. जत्रेचा एक वेगळाच आनंद अनुभवयास मिळत असतो.
मात्र, या वर्षी कोरोनामुळे या सर्वांवर विरजण पडले आहे. सध्या कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आल्याने भोर तालुक्यातील आंबवडे व हिर्डोशी,भुतोंडे खोऱ्यातील जत्रा आता सुरू झाल्या आहेत. अगदी साध्या पद्धतीने हे सण उत्सव साजरे करण्यात येत आहेत. देवाला नैवेद्य दाखवून सर्व विधी करण्यात येत आहेत. या भागातील जत्रा साधारण दीड दोन महिना चालतात. त्यामुळे भागातील गावे या दोन महिन्यांत खूप गजबजलेली असतात. परंतु आता कोरोनामुळे जत्रा असूनदेखील गजबजलेली गावे अगदी शांत वाटत आहेत. कोरोनामुळे जत्रा साध्या पध्दतीने साजरी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.त्यामुळे विविध खेळणी, फरसाण, भेळ, जेवण बनवणारे केटर्सवाले, ढोल-लेझिम खेळ, झांज पथके, आँकेस्ट्रा हे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे आर्थिक संकटात सापडले आहेत. तर तमाशा कलावंतांना जत्राच भरत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.