कोरोना अनुदान लाटणाऱ्यांवर संक्रांत! तातडीने परत न केल्यास संबंधित बँक खाते गोठविण्यात येणार
By नितीन चौधरी | Published: September 7, 2022 07:41 AM2022-09-07T07:41:46+5:302022-09-07T07:44:30+5:30
पुणे जिल्ह्यात असे ३१३ वारस आढळले आहेत. दोनदा अनुदान घेणाऱ्यांना आता ते परत करावे लागणार आहे.
पुणे : कोरोना मृतांच्या वारसांना राज्य सरकारने ५० हजारांचे सानुग्रह अनुदान द्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होेते. त्यानुसार राज्यातील सुमारे दोन लाख वारसांचे अर्ज मंजूर झाले असून, तब्बल १ हजारांहून अधिक जणांना हे अनुदान दोनदा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यात असे ३१३ वारस आढळले आहेत. दोनदा अनुदान घेणाऱ्यांना आता ते परत करावे लागणार आहे. तसे न केल्यास संबंधित बँक खाते गोठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संकेतस्थळावर १.४८ लाख जणांच्या मृत्यूची नाेंद
- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावर राज्यात कोरोनामुळे १.४८ लाख जणांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे.
- केंद्राच्या तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोरोना मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे ठरले होते. त्यानंतर राज्यात यासाठी २.६० लाख अर्ज आले. त्यापैकी १.९७ लाख अर्ज मंजूर करण्यात आले.
अनेक ठिकाणांहून अर्ज -
राज्याने आतापर्यंत या अनुदानापोटी ९८२.२१ कोटी रुपये वितरित केले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आता सर्व जिल्हाधिकारी व आयुक्तांना हे अनुदान त्वरित परत करण्याची खात्री करण्यास सांगितले आहे.
पुण्यात ३१३ अर्जदार -
राज्यात अनेकांनी मृत व्यक्ती आपले नातेवाईक दाखवून अनुदान लाटण्याचा प्रयत्न केला आहे. ही संख्या १००३ इतकी आहे. दोनदा अनुदान लाटलेल्यांमध्ये पुणे जिल्ह्यात असे ३१३ अर्जदार आहेत. या सर्व अर्जांची छाननी सुरू आहे.
ज्यांनी दावे केले होते त्यांचे बँक तपशील आहेत. अशांना वैयक्तिक कळविले आहे. अनुदान परत करण्यास सांगितले आहे. तसे न केल्यास ते वसूल केले जाईल; अन्यथा त्यांचे बँक खाते गोठविण्यात येईल.
- संजय धारूरकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन विभाग