संक्रांतीमुळे बोरांना मागणी वाढली ; दरही वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:24 AM2021-01-13T04:24:23+5:302021-01-13T04:24:23+5:30
पुणे : संक्रांतीमुळे बोरांना मागणी वाढली असून, दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रविवारी मार्केट यार्डात ...
पुणे : संक्रांतीमुळे बोरांना मागणी वाढली असून, दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रविवारी मार्केट यार्डात ३५० गोण्यांची बोरांची आवक झाली. मात्र, मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने दरदेखील वाढल्याची माहिती व्यापारी रवींद्र शहा यांनी दिली. बोरे वगळता कोणत्याही फळांच्या दरात वाढ झाली नाही. डाळिंबाची आवक घटल्याने दर तेजीतच आहेत. दरम्यान कलिंगड, खरबूज, पपई, मोसंबी, संत्रा, स्ट्रॉबेरी, अननस, चिक्कू, पेरू आणि लिंबांचे दर स्थिरच असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
बोरांचे व्यापारी रवींद्र शहा यांनी सांगितले की, संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बोरांची आवक वाढली आहे. अजून एक ते दोनदिवसांत बोरांची आवक मागणी आणि दरही वाढतील.
रविवारी मार्केट यार्डात फळबाजारात केरळ येथून अननस ७ ट्रक, मोसंबी १४ ते १५ टन, संत्री ८ ते १० टन, डाळिंब ३० ते ४० टन, पपई २० ते ५ टेम्पो, लिंबे दोन ते अडीच हजार गोणी, पेरू ५०० क्रेट, चिक्कू १ हजार गोणी, खरबुजाची १५ ते २० टेम्पो, बोरे ३५० गोणी, स्ट्रॉबेरी १० ते १२ टन इतकी आवक झाली.
---
पावसामुळे फुलांचे नुकसान
गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारातील एकूण आवकेपैकी ३० ते ४० टक्के ओल्या मालाची आवक झाली आहे. शेवंतीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. दरम्यान, सर्वच प्रकारच्या फुलांमध्ये २० ते ३० टक्क्यांनी घसरण झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे़. तर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर फुलांचे दर वाढतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.